‘मोरबे’ भरून वाहू लागले ही खरी तर नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. त्यामुळे जलपूजनाचा सोहळाही असाच आनंदमयी असायला हवा होता. मात्र मालकीच्या धरणाचे पाणी खारघर, कळंबोलीला वळविण्याचा आदेश काढायचा आणि बारवी धरणातून मंजूर पाणीही शहराला द्यायचे नाही हा नवी मुंबईवर अन्यायच आहे. यामुळे जलपूजनाचा कार्यक्रम आटोपताचा वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

राज्यातील एक नियोजनबद्ध शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. मुंबईनंतर स्वत:च्या मालकीचे धरण असलेली एकमेव महापालिका असा नवी मुंबई महापालिकेचा नावलौकिक आहे. धरणाची मालकी असल्याने या शहराने मागील दीड दशकापासून पाणीटंचाई अनुभवली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलू लागले आहे. शहरातील काही उपनगरे, वस्त्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे.

‘मोरबे’ धरणाच्या जलपूजनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या बदलत्या परिस्थितीचे पडसाद उमटताना दिसले. ‘मोरबे’ भरून वाहू लागले ही खरी तर नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. त्यामुळे जलपूजनाचा सोहळाही असाच आनंदमयी असायला हवा होता. मात्र या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले वनमंत्री गणेश नाईक यांनी जलपूजन आटोपताच आयुक्त डाॅ. कैलाश शिंदे यांच्यादेखत उपस्थित अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले आणि शाबासकीच्या अपेक्षेने प्रगतिपुस्तक हाती ठेवलेल्या विद्यार्थ्याच्या श्रीमुखात बसावी अशी अवस्था उपस्थितांची झाली. या आनंद सोहळ्यात नाईक इतके का संतापले आणि समोर येईल त्याच्यावर का बरसत राहिले, याचीच चर्चा सध्या शहरात आहे.

‘नवी मुंबईचे पाणी पनवेल, खारघरला तुम्ही कुणाला विचारून दिले’ असा थेट सवाल नाईकांनी या वेळी केला. धरण असूनही नवी मुंबईला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने शहरात नाराजी, अस्वस्थता आहेच; परंतु नाईकांच्या आक्रमकतेमागे केवळ हे एकमेव कारण नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षात या पाणीवादाचे खरे मूळ लपले आहे.

मोरबेचे पाणी इतर शहरांना द्यावे लागत असताना महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाची मालकी असलेल्या ‘बारवी’ धरणातून नवी मुंबईसाठी ठरवून देण्यात आलेला पाण्याचा कोटा पूर्ण क्षमतेने मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना नवी मुंबईच्या हक्काचे हे पाणी तहानग्रस्त असलेल्या लगतच्या शहरांना वळविण्यात आल्याचा आक्षेप आहे. असे म्हणतात, हे पाणी शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत यांच्या मतदारसंघातील काही शहरांमध्ये वळविण्यात आले. नवी मुंबईला मिळणाऱ्या पाण्यात मंजूर कोट्यापेक्षा जवळपास २५ ते ३० एमएलडी इतकी तफावत आहे, असेही बोलले जाते. त्यामुळे नाईकांना आलेला राग तसा वाजवी आहे.

मालकीच्या धरणाचे पाणी खारघर, कळंबोलीला वळविण्याचा आदेश काढायचा आणि बारवी धरणातून मंजूर पाणीही शहराला द्यायचे नाही हा नवी मुंबईवर अन्यायच आहे. त्यामुळे नाईक भडकले आणि अधिकाऱ्यांवर बरसले, असे त्यांचे समर्थक म्हणतात. ‘नवी मुंबईचे पाणी कोणी चोरले’ हा सवाल नाईक यांनी यापूर्वी केला आहे. आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने आपली लढाई कुणासोबत आहे याची पूर्ण कल्पना त्यांना आहेच. त्यामुळे आमच्या शहराचे पाणी कुणी चोरले, असा सवाल करताना नाईक पुन:पुन्हा शिंदे यांनाच डिवचत असतात. विद्यमान महापालिका आयुक्त डाॅ. कैलाश शिंदे यांच्या कार्यपद्धतीविषयी देखील त्यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केलेली दिसते. कैलाश शिंदे यांच्याकडे नवी मुंबईचे आयुक्तपद आले ते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना. पालघरचे जिल्हाधिकारी, सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक ते थेट नवी मुंबई महापालिका आयुक्त हा डाॅ. शिंदे यांचा प्रवास चढत्या क्रमाचा ठरला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले अधिकारी अशी ओळख असलेले डाॅ. शिंदे एके काळी देवेंद्र फडणवीस यांच्याही प्रशासकीय वर्तुळात वावरले आहेत. त्यामुळे देवाभाऊ आणि एकनाथ भाऊ अशा दोघांच्याही कार्यपद्धतीची त्यांना कल्पना आहे. असे असले तरी नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या निमित्ताने त्यांनी गणेश नाईकांचा रोष ओढवून घेतल्याची चर्चा आहे. कैलाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रभाग रचना जाहीर झाली. ही रचना नाईक समर्थकांच्या नाराजीचे मुख्य कारण ठरली आहे. राज्यात मुख्यमंत्री भाजपचा असूनही नवी मुंबईतील प्रभागांवर ठाण्याचा प्रभाव राहिल्यामुळे नाईकांचा पारा अधिकच चढल्याचे सांगतात. मोरबेच्या जलपूजन सोहळ्यात नाईकांच्या रागाचे कारण असमान पद्धतीने होणारे पाणीवाटप असले तरी खारघर, कळंबोलीवासीयांपेक्षा त्यांचे लक्ष्य एकनाथ शिंदे हे तर होतेच, मात्र ठाण्याचे आदेश मानणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

रोजचा राग काय कामाचा?

नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून नाईक या शहरात सत्ताधारीच राहिले आहेत. राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर भाजप सत्तेत आला तेव्हा नाईक या सत्तेचे वाटेकरी असायला हवे होते. झाले मात्र उलट. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि राज्यात सत्ता असूनही नाईकांवर नवी मुंबईतील बालेकिल्ल्यात दुय्यम भूमिकेत वावरण्याची वेळ आली. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाले नाहीच, शिवाय नवी मुंबईचा कारभार ठाण्याहून हाकला जाऊ लागला. तेव्हापासून नाईक अधिकच आक्रमक बनले आहेत.

नवी मुंबईत नाईक अधूनमधून वेगवेगळ्या प्रश्नांवर आढावा बैठका घेत असतात. आयुक्तांसमक्ष ते अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. बदल्यांचे आदेश देतात, सूचना सांगतात. मध्यंतरी ऐरोलीतील एका विभाग अधिकाऱ्याला त्यांनी फैलावर घेतले. या अधिकाऱ्याने विरोधी पक्षातील एका नेत्याच्या दहीहंडी सोहळ्याला भर रस्त्यात परवानगी दिल्याने नाईक चिडले होते. प्रतिनियुक्तीवर आलेल्या या अधिकाऱ्याला दोन दिवसांत महापालिका सोडून जा, असे आदेश नाईक यांनी दिला असे म्हणतात. दुसऱ्या एका अधिकाऱ्याला त्यांनी फोनवर स्वत:कडील खाते सोड नाही तर बघच असाही दम भरला. महिना उलटला तरी ते दोन्ही अधिकारी आहेत तिथेच आहेत. शहरावर काही प्रश्नांवर अन्याय होत असताना नाईकांचे चिडणे स्वाभाविकच म्हणायला हवे. सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या मनातले नाईक बोलतात असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. नाईकांच्या या सततच्या चिडचिडीवर त्यांच्याच दरबारातून बाहेर पडलेल्या अधिकाऱ्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी होती. तो म्हणाला, ‘मेलेलं कोंबडं आगीला भितंय व्हय’…