नवी मुंबई : कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका मॅनेजरकडून महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील चित्रीकरण केल्याचा आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपी मॅनेजरसह त्याची पत्नी गुन्ह्यात सहभागी असल्याचेही समोर आले असून, पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

पनवेल शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रदीप नामदेव नरळे (वय ३४) असे असून तो अंधेरी येथील एका विमा कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी रेणुका नरळे आणि भाऊ प्रविण नरळे हे दोघेही या प्रकरणात सहआरोपी असून सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

तक्रारीनुसार, आरोपी नरळे याची ओळख त्याच्याच कंपनीच्या नागपूर शाखेत कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय महिला सहकाऱ्याशी ऑनलाइन मीटिंगदरम्यान झाली होती. कामाच्या निमित्ताने झालेली ही ओळख पुढे वैयक्तिक नात्यात बदलली. २७ मार्च रोजी कामानिमित्त मुंबईत आलेल्या त्या महिलेला नरळे याने पनवेल येथील आपल्या घरी बोलावले. पाहुणचाराच्या बहाण्याने दिलेल्या जेवणात त्याने गुंगी आणणारे औषध मिसळले. त्यानंतर पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्याचे चित्रीकरण आरोपीच्या पत्नीने केले असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानंतर आरोपी दाम्पत्याने या व्हिडिओच्या माध्यमातून पीडित महिलेला धमकावत तिच्याकडून मोठी आर्थिक खंडणी उकळली. अत्याचार आणि धमकीच्या या चक्रातून कंटाळून अखेर पीडित महिलेनं धैर्य एकवटत पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी सापळा रचून प्रदीप नरळे याला अटक केली असून, त्याच्या पत्नी व भावाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. आरोपींवर बलात्कार, गुंगीचे औषध देणे, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.