नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर राहणार. युती झाली तरी आणि नाही झाली तरी देखील भाजपचा महापौर राहणार असे सूचक वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केले होते. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी प्रत्युत्तर देत नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर राहणार हे कोणी ठरवले. पालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि हे सर्व ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. इतरांना हे ठरवण्याचा अधिकार नाही अशी परखड टिका चौगुले यांनी केली.
वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले हे कट्टर राजकीय विरोधक म्हणुन ओळखले जातात. मागील काही दिवसांपुर्वीच एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली, असे विधान वनमंत्री व भाजपचे नेते गणेश नाईक यांनी केले होते. यावरून वाद रंगला होता. या वादात नवी मुंबईतील शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी उडी घेत नाईक यांच्यावर सडकून टिका केली होती..
“ मुकेश अंबानी हे मध्ये पडले नसते तर, यांची (गणेश नाईक) लाॅटरी लागली नसती”, अशी टिका याविषयावर बोलताना विजय चौगुले यांनी केली होती. तर, या टिकेला उत्तर देताना “मी काही नाकारत नाही. सर्वांच्या आर्शीवादाने मिळाले” असे गणेश नाईक म्हणाले. यामुळे नाईक आणि चौगुले यांच्यातील वाद निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर दिवसेंदिवस रंगताना दिसून येत आहे. अशातच नवी मुंबई महापालिकेचा महापौर कोण असणार या विषयावर पुन्हा एकदा वाद रंगल्याचे चित्र आहे.
नेमके झाले काय ?
काही दिवसांपुर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर राहणार. युती झाली तरी भाजपाचा महापौर, नाही झाली तरी भाजपचाच महापौर राहणार असे सूचक वक्तव्य केले होते. नवी मुंबईतील जनतेला किंवा महाराष्ट्रातील जनतेला नवी मुंबई कोणाची आहे, हे सांगायची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यास प्रत्युत्तर देत विजय चौगुले यांनी भाजपचाच महापौर असेल हे कोणी ठरवले. महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल. हे ठरवण्याचा अधिकारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. इतरांना तो अधिकार नाही असे स्पष्ट प्रत्युत्तर त्यांनी दिले.
