पनवेल: मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी पळस्पे ते गव्हाणफाटा मार्गे पामबीच मार्गे वाशी या मार्गावरून जरांगे यांच्या सोबत येणा-या वाहनांचा ताफा मुंबईकडे जाण्याची आखणी केली आहे. आंदोलकांच्या असंख्य वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडी नवी मुंबईत होऊ नये म्हणून यासाठी ज्यावेळेस आंदोलकांची वाहने मार्गस्थ होतील त्यावेळेस नवी मुंबईतील महामार्गावर प्रवेश बंदीची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक पोलीसांनी बुधवारी जाहीर केली.
नवी मुंबई वाहतूक पोलिस उपायुक्त तिरूपती काकडे यांनी काढलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेत लोणावळा, खोपोली येथून मुंबई–पुणे द्रुुतगती महामार्गावरून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत येणाऱ्या वाहनांना तसेच रायगड जिल्ह्यातील खालापूर शेडुंग मार्गे येणाऱ्या वाहनांनी पनवेल शहर आणि कळंबोली परिसरातील महामार्गावर शिरकाव करू नये म्हणून ज्यावेळेस आंदोलकांची वाहने येतील त्यावेळेस मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावरून कोनफाटाकडे तसेच बोर्ले टोलनाका ते पळस्पे फाटा महामार्गावर प्रवेश बंदी असणार आहे. या दरम्यान हलकी व दुचाकींसाठी कळंबोली सर्कलमार्गे पनवेल शीव महामार्गावरून आणि खालापूर व खोपोली मार्गाचा वापर करू शकतील. या दरम्यान कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील पनवेल शीव महामार्गावरून मुंबईकडे जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तसेच मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते अटलसेतूला जोडणा-या जेएनपीटीच्या महामार्गावर आंदोलकांची वाहनांना वाट करून दिले जाईल या दरम्यान अवजड वाहनांना पळस्पे ते गव्हाणफाटा या दरम्यान प्रवेश बंदी राहणार आहे. या दरम्यान हलकी व दुचाकी साईगाव, दिघोडे, चिरनेर मार्गाचा पर्याय वाहनचालक वापरू शकतील. पनवेल येथील पळस्पे फाटा ते डि पॉईंट जेएनपीटी मार्ग आंदोलकांची वाहने जातील त्यावेळेस हा मार्ग अवजड व इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात येईल त्यावेळेस हलक्या वाहनांनी पनवेल शहर, कळंबोली उरणफाटा या अंतर्गत मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गव्हाण फाटा पोलीस चौकीच्या अंतर्गत येणारी जेएनपीटी महामार्ग ते गव्हाणफाटा आणि किल्ला जंक्शन या मार्गावरून आंदोलकांची वाहने पामबीच मार्गे वाशीपर्यंत जातील. या दरम्यान या महामार्गावरून इतर वाहनांची वाहतूंक बंद ठेवली आहे. या दरम्यान नवी मुंबईतील हलक्या वाहनांनी नवी मुंबईतील अंतर्गत रस्ते वापरण्याचे आवाहन केले आहे.
सीबीडीमधील वाहनांना सुद्धा आंदोलकांची वाहने ज्यावेळेस पामबीच मार्गावरून जातील त्यावेळेस हा मार्ग वापरता येणार नाही. यावेळी आर्ममार्ग आणि ठाणे मार्गाचा वापर करण्याचा पर्याय वाहतूक पोलिसांनी सूचवला आहे.ज्यावेळेस आंदोलकांची वाहने वाशी येथून मार्गस्थ होतील. त्यावेळेस वाशीप्लाझा आणि वाशी रेल्वेस्थानकाकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अशावेळी वाशीतील हलक्या वाहनांना पनवेल शीव महामार्गे सानपाडा रेल्वेस्थानकाशेजारील सेवा रस्त्याने वाशी रेल्वे स्थानकाकडे पोहोचू शकतील.
वाहतूक पोलिसांचे हे निर्बंध केवळ आंदोलनादरम्यान लागू राहतील. आपत्कालीन सेवा, जसे की रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलिस व जीवनावश्यक सेवा असलेल्या वाहनांना मात्र या बंदीमधून सूट असेल. वाहनचालकांनी गर्दी व अडचणी टाळण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिस दलाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.