नवी मुंबई : दिवाळीचा सण उलटूनही वाशीतील नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन मंडळाचा अत्याधुनिक बस डेपो अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. मागील दीड वर्षापासून पूर्णतः तयार असलेले हे संकुल अद्याप वापरात आलेले नाही. यामुळे प्रवाशांना उघड्यावर ताटकळत बसची वाट पाहावी लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

परिवहन विभागाकडून जून २०२३ पर्यंत डेपो सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ऑक्टोबर २०२५ महिना संपत आला तरी अद्याप प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अत्याधुनिक सुविधा असलेला हा डेपो आणि त्यातील वाणिज्य संकुल हे अद्याप धूळ खात पडल्याचे चित्र आहे.

वाशी हे नवी मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथून दररोज हजारो प्रवासी कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर, ठाणे आणि मुंबईकडे प्रवास करतात. मात्र, नव्याने उभारण्यात आलेला बस डेपो अद्याप बंद असल्याने सध्या प्रवाशांना अस्थायी थांब्यांवरून बस पकडावी लागत आहे. यंदा पावसाळा लांबल्याने ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. याबाबत महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक योगेश कुडुसकर यांना संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे वाशी डेपो प्रवाशांच्या सेवेसाठी कधी सुरू होणार? याबाबत अद्याप तरी संभ्रम कायम आहे.

वाणिज्य संकुलातून मिळणारा महसूलही रखडला

महापालिकेच्या वतीने वाशी सेक्टर ९मध्ये उभारण्यात आलेल्या या आधुनिक बस डेपो आणि वाणिज्य संकुलासाठी सुरुवातीला १५९ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्ष इमारत उभारणीचा खर्च १४० कोटी रुपयांपर्यंत अपेक्षित होता; मात्र कामात झालेल्या विलंबामुळे एकूण खर्च १९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या काळात या प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. २२ मजली वाणिज्य संकुल आणि अत्याधुनिक बस टर्मिनस आता पूर्णतः तयार असून आतील कामेसुद्धा पूर्ण झाली आहेत. येथे असलेल्या व्यावसायिक जागा भाड्याने देऊन दरवर्षी सुमारे ३३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तरीदेखील बस डेपोचे उद्घाटन न झाल्याने संपूर्ण सुविधा ठप्प आहेत. त्यामुळे डेपोत उभारलेल्या वाणिज्य संकुलातून मिळणारा महसूलही रखडला असून, नागरिकांच्या संयमाचा बांधही आता फुटू लागला आहे.

खासगी वाहन, रिक्षाचालकांना ‘सुगीचे दिवस’

महापालिकेने प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधांनी सज्ज डेपो उभारला असला, तरी तो प्रत्यक्षात सुरू न झाल्याने हा प्रकल्प ‘रखडलेल्या विकासाचा आणखी एक नमुना’ ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे. सध्या डेपोच्या शेजारील बसथांब्यावर विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक तासनतास उभे राहतात. त्यामुळे खासगी वाहन आणि रिक्षाचालकांचे ‘सुगीचे दिवस’ सुरू झाले असून, त्याचा थेट फटका सामान्य प्रवाशांच्या खिशावर बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन वाशीतला हा बस डेपो त्वरित सुरू करावा, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.