पालघर : मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत सफाळा पश्चिमेला जलसार, टेंभीखोडावे व विराथन गावा दरम्यान असलेल्या डोंगरामध्ये बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या विस्फोटांमुळे जलसाल, टेंभीखोडावे व विराथन बुद्रुक या गावांमधील २०० पेक्षा अधिक घरांच्या भिंतीला व फारशीला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे बोगदा घडण्यासाठी हे स्फोट पुढील सहा- आठ महिने सुरू राहण्याची शक्यता असून घरांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही.
जलसार गावाच्या लगत असणाऱ्या डोंगरामधून बुलेट ट्रेनसाठी बोगदा उभारण्याचे काम मार्च २०२५ मध्ये हाती घेण्यात आले. याकरिता होणाऱ्या स्फोटांची तीव्रता स्फोट घडणाऱ्या ठिकाणापासून ५०० मीटर पर्यंत मर्यादित राहील असे अंदाजित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात स्फोटाच्या ठिकाणापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर पर्यंत असणाऱ्या घरांना लहान मोठ्या आकाराचे तडे गेले असून अनेक घरांची फरशी तुटल्याचे त्यामध्ये भेगा पडण्याचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.
या स्फोटामुळे नागरी वस्तीमध्ये होणाऱ्या परिणामाबाबत तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र याविषयी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. राजकीय पक्षांच्या स्थानिक नेते मंडळींनी देखील या प्रकरणात लक्ष घालून बाधित घरांना नुकसान भरपाई देण्यासाठी पाठपुरावा केला होता.
बोगद्यासाठी स्फोट घडवणारे ठेकेदारामार्फत सध्या ६५ घरांना हंगामी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरीही सद्यस्थितीत दारशेत पाडा, पाटील पाडा, किराटपाडा, गेट पाडा, धोदडे पाडा, धुमाडा पाडा या जुन्या जहराल पाड्यातील २०० पेक्षा अधिक घरांना या स्फोटांमुळे बेजार झाली आहे. या प्रकरणात पालघरच्या तहसीलदारांना माहिती दिल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांमार्फत या गावांमधील सर्वेक्षण हाती घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दारशेत पाडा परिसरात घरांच्या पासून अवघ्या ५० मीटरवर काही स्फोट घडून आल्याने अंगणवाडीचे छत कोसळणे, घरांमधील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार घडले असून स्फोट घडवण्याचे काम सुरू असताना हंगामी मदत तसेच स्फोट पूर्ण झाल्यानंतर घराच्या दुरुस्तीसाठी तज्ञ समितीद्वारे पाहणी करून आवश्यक नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या स्फोटांदरम्यान काही वेळा सायरनद्वारे पूर्वसूचना देण्यात येत असली तरी अनेकदा अचानकपणे रायफलच्या फायरिंग प्रमाणे सलगपणे (सिरीज मध्ये) स्फोट घडवून आल्याने नागरिकांमध्ये व विशेषतः लहान मुलं व वयोवृद्धमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात संरक्षित वन असल्याने त्यांना देखील त्या ठिकाणी असणाऱ्या विविध वनप्राण्यांना या स्फोटांचा परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांची व बुलेट ट्रेन व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक आयोजित करून बाधितांना नुकसान भरपाई देण्याचा आराखडा निश्चित करावा अशी मागणी ग्रामपंचायत जलसार यांनी पत्राद्वारे केली आहे.
जलसार परिसरातील घरांच्या झालेल्या नुकसालीच्या आढावा घेण्यासाठी संबंधित ठेकेदार व ग्रामस्थांनी स्वतंत्र तांत्रिक सल्लागार नेमले आहेत. या दोन संस्थांमध्ये संयुक्त पणे अभ्यास दौरा करून अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर नुकसान भरपाई बाबत निश्चित निर्णय घेण्यात येईल. – रमेश शेंडगे, तहसीलदार पालघर.