पालघर : पालघर जिल्ह्यात सध्या विकास कामांचा पूर आला असला तरी काही क्षेत्रांमध्ये अजूनही अपेक्षित प्रगती झालेली नाही. जिल्ह्यातील आकांक्षीत क्षेत्राकडे लक्ष देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जात असून त्यानंतरच जिल्ह्याचा खरा अर्थाने विकास होईल असे पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रतिपादन केले.

पालघर जिल्ह्याचा वर्धापन दिन व महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील, जिल्हा भूमी अभिलेख नरेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

खाजगी व शासकीय क्षेत्रांमध्ये अनेक मूलभूत फरक असून शासकीय अधिकारी अनेक मर्यादित उत्तमरीत्या काम करीत आहेत. तरी देखील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली मरगळ झटकून अधिकाधिक लोकाभिमुख काम करायला हवे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. राज्य शासनाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आराखड्यात सर्व विभागांशी समन्वय साधण्यासाठी तसेच उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मध्यवर्ती भूमिका महसूल विभागाने घ्यावी असे सूचित केल्याचे त्यांनी माहिती दिली. महसूल कर्मचाऱ्यांनी निष्ठेने, पारदर्शक पद्धतीने व सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम केल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यास यश लाभेल असे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात प्रलंबित असणारी वनपट्ट्यांची प्रकरण येत्या काही दिवसात मार्गी लागून वहपट्टेधारकांना मनरेगा अंतर्गत बांबू लागवड करण्याचे योजना राबवली जात असल्याची त्यांनी माहिती दिली. या उपक्रमामुळे बांबू उत्पादनातून आर्थिक उत्पन्न लाभून ग्रामीण भागातील व विशेषता आदिवासी बांधवांना स्थैर प्राप्त होईल असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी आकांक्षी क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या, विशेष कार्य करणाऱ्या महसूल अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य व इतर क्षेत्रात योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्डचे तसेच वनपट्टेधारकांना वनपट्ट्यांची वाटप करून भूसंपादन झालेल्या जमीन मालकाला त्याचा मोबदला प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आला.

याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी महसूल विभाग हा जनतेसाठी वाहून घेतलेला विभाग असल्याचे गौरव उद्गार काढून जिल्हाधिकारी यांनी सर्व घटकांचा सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ब्रिटिश कालीन शासक असणारे महसूल विभाग नंतर प्रशासक व सध्या लोकसभेच्या भूमिकेत आल्याचे त्यांनी सांगितले. तर राजेंद्र गावित यांनी जिल्हा स्थापनेपासून झालेल्या विकासाचा आढाव घेत अजूनही माता मृत्यू बालमृत्यू व इतर समस्यांनी जिल्हा ग्रासला असल्याकडे लक्ष वेधले.

बयाना देणे थांबवावे – विवेक पंडित

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक सावकारांकडून पावसाळ्याच्या कालावधीत आगाऊ रक्कम अर्थात बयाना देण्याची पद्धत आहे. याच पद्धतीमुळे स्थलांतराची समस्या कायम असून जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे बयाना देणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी आग्रही मागणी विवेक पंडित यांनी याप्रसंगी केली. यासंदर्भात कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद असताना याविषयी प्रत्येक गावात बाहेर माहिती फलक लावून जनजागृती करण्याचे त्यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले.

सध्या जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना मूलभूत व पायाभूत सुविधांचा स्तर उंचावणे म्हणजे विकास अशी संकल्पना नसल्याबद्दल विवेक पंडित यांनी सांगून आदिवासी व सामान्य माणसाचे विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महसूल व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःला लोकसेवक समजायला लागल्यानंतर समोर समस्या घेऊन येणारे व्यक्ती हाच राजा असल्याची भावना निर्माण होईल व जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने विकास साधला जाईल असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या स्थापने नंतर अपेक्षित गतीने विकास झाला नसून गरिबांचा विकास साधण्यासाठी व दारिद्र्यावर मात करण्यासाठी अधिक काटेकोर नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.