पालघर : पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद व वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने तिरंगी व चौरंगी लढत होत असल्याचे दिसून आले आहे. पालघर नगर परिषदेत भाजपातर्फे माजी गटनेते कैलास म्हात्रे , शिवसेना (शिंदे) तर्फे माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत, शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे व काँग्रेस पक्षातर्फे माजी नगरसेवक प्रीतम राऊत यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शिवसेना पक्षाचे प्रवक्ते व माजी नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांचे पती केदार काळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तसेच भाजपमधून तिकीट नाकारल्याने ओबीसी सेल चे प्रशांत पाटील यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
डहाणू नगरपरिषद क्षेत्रात मावळते नगराध्यक्ष भरत राजपूत भाजपाच्या तिकिटावर पुन्हा रिंगणात उतरले असून शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी, शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे संजय पाटील, काँग्रेस तर्फे हाफिज खान यांनी अर्ज दाखल केले आहेत.जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाने माजी नगरसेवक कुणाल उदावंत यांच्या पत्नी पूजा उदावंत यांना उमेदवारी दिली असून शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार पक्षातर्फे) माजी उपाध्यक्ष पद्मा गणेश रजपूत निवडणूक रिंगणात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे माजी नगरसेविका रश्मी रियाज मणियार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वाडा नगरपंचायतीसाठी भाजपातर्फे माजी नगरसेविका रिमा हर्षद गंधे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली असून शिवसेना (शिंदे) पक्षाकडून शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांची बहीण हेमांगी हिरामण पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे यांची पत्नी निकिता गंधे यांनी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून रंजीता प्रफुल्ल पाटील व रिद्धी गौरव भोईर यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
