-
परभणीतील स्टेडियम मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा होती.
-
सभेपूर्वीच पावसाळी वातावरण तयार झाले होते. ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच पावसाला प्रारंभ झाला. भाषणाच्या शेवटी पावसाचा वेग वाढला. व्यासपीठावर भिजत असतानाच उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरूच होते.
-
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, श्रीमती फौजिया खान, आमदार राहुल पाटील, सुरेश वरपूडकर, विजय गव्हाणे आदींसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
-
आपल्या बारा मिनिटांच्या भाषणात ठाकरे यांनी भाजपावर चौफेर हल्ला चढवला.
-
मी पावसात भिजणार आहे, तुम्ही भिजणार आहात की नाही? असा सवाल करत शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
-
“वेगवेगळ्या वाहिन्यावर लागणाऱ्या मालिकांप्रमाणे भाकड जनता पक्षाची २०१४, २०१९ नंतर आता ‘जुमला ३’ ही मालिका सध्या सुरू असून या मालिकेचा अँकर, खलनायक, संहितालेखक तोच आहे. या लोकांनी महाराष्ट्र दहा वर्षांत नासवून टाकला, देश नासवून टाकला. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या गाण्यातील ‘जय भवानी’ हा शब्द हटवणार नाही. मोदींच्या एकाधिकारशाही विरुद्ध सातत्याने बोलत राहणार,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“महाराष्ट्रात मोदींचा चेहरा चालत नाही म्हणून तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरले. भाजपाने महाराष्ट्र लुटला, या राज्यातले उद्याोगधंदे लुटले”, असा आरोपही यावेळी ठाकरे यांनी केला.
-
भाषणाला सुरुवात होताच पाऊस सुरू झाल्याने वादळाच्या छातीवर आम्ही वार करणारे आहोत असे सांगत ठाकरे यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला. “आपण एकाधिकारशाही विरोधात सातत्याने बोलत राहणार. ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. लोकशाहीच्या बाजूने महाराष्ट्र उभा राहील. अशा लोकांना एकही मत मिळता कामा नये. खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे दोघेही पक्षाशी एकनिष्ठ राहिले, परभणीकर कधीही विकले जाऊ शकत नाहीत हे तुम्ही सिद्ध केले आहे.” असे ते म्हणाले.
-
सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका
“सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील जाहीर सभेत, मोदींसमोरील सभेत बहिण-भावाच्या नात्याबद्दल विचित्र बोलले. महिलांचा अवमान करण्याचं काम या नेत्यांकडून होत आहे. यापूर्वीही सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना मराठवाड्यातील एका मंत्र्याने शिवी दिली होती. मात्र, मोदी-शाह यावर काहीही बोलायला तयार नाही. महिलांचा अपमान चालेल, पण आम्हाला मतं द्या, हीच त्यांची भूमिका आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. -
जानकरांचं डिपॉझिट जप्त करा
“मला माझ्या आई-वडिलांचा अभिमान आहे, मी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मिनाताईंचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. तुम्ही आमच्या घराणेशाहीवर बोलता, तेव्हा आमची ही जनता ठरवेल. पण, तुमच्या एकाधिकारशाहीवर बोलतो, आणि बोलणारच, अब की बार, भाजपा तडीपार करायची आहे. म्हणून संजय जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करा, असे म्हणत महादेव जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेतून केलं. यावेळी, भरपावसात परभणीकरांनी सभा ऐकली, तर उद्धव ठाकरेंनीही भरपावसात आपलं भाषण पूर्ण केलं. -
(सर्व फोटो साभार- ShivSena/फेसबुक पेज)
Lok Sabha Election : उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; भाजपावर चौफेर टीकास्र! म्हणाले, “महाराष्ट्र दहा..”
महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची काल २३ एप्रिल रोजी परभणीत जाहीर सभा होती.
Web Title: Uddhav thackeray parbhani constituency rainy sabha latest speech new statements on bjp spl