-
नकली शिवसेनेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसैनिकांना धोका दिला असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
-
देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाळासाहेबांनी कायम विरोध केला. पण उद्धव ठाकरे हे घुसखोरीचे समर्थन करणाऱ्यांबरोबर जाऊन बसले. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीलाही धोका दिला, अशा शब्दांत मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढविला.
-
काँग्रेसला मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून ते मतांचा जिहाद करणाऱ्या अल्पसंख्याकांना द्यायचे आहे. पण धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. त्यामुळे मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा डाव म्हणजे संविधानाचा अपमान आहे. मी संविधान रक्षक असून हा डाव कदापीही यशस्वी होऊ देणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
-
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रचारासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर महाविजय संकल्प सभेचे आयोजन शुक्रवारी (१७ मे) करण्यात आले होते.
-
गर्दीने खचाखच भरलेल्या शिवाजी पार्कवर मोदी यांनी ‘मत (व्होट) जिहाद’ हाणून पाडून २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदानाचे आवाहन केले. मत देताना मुंबईवरील हल्ल्यांच्या घटना आठवून शहिदांचा अवमान करणाऱ्यांविरोधात मत द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
-
जनादेश मोडून सरकार
ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, जनादेश मोडून ठाकरे यांनी राज्यात सरकार स्थापन केले आणि अयोध्येतील राममंदिराला विरोध करणाऱ्यांबरोबर गेले. -
अन्य देशांमधून भारतात आलेल्या हिंदू, बौद्धांना देशाचे नागरिकत्व देण्यास म्हणजे सीएएलाही ठाकरे यांनी विरोध केला. आपल्या विचारधारेत एवढे परिवर्तन झालेला दुसरा पक्ष आढळणार नाही.
-
मुंबईतील विकास प्रकल्पांमध्येही ठाकरे यांनी अडथळे आणले. बुलेट ट्रेन, मालवाहतूक कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्पांसह जनहिताचे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प रोखले. ते आता शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सुरू केले आहेत.
-
स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर ठाकरे आज आहेत. स्वा. सावरकरांचा आयुष्यात कधीही अवमान करणार नाही, असे राहुल गांधी यांनी जाहीर करावे, असे आव्हान मोदी यांनी दिले. काँग्रेसचा माओवादी जाहीरनामा अंमलात आणण्याचे ठरविले, तर देश दिवाळखोरीत जाईल, असेही मोदी म्हणाले.
-
(सर्व फोटो देवेंद्र फडणवीस या फेसबुक पेजवरुन साभार.)
उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल! पंतप्रधान मोदी मुंबईतील भाषणात काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले…
Web Title: Pm narendra modi speech details shivaji park dadar mumbai latest news spl