Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sugar conference 2022 sharad pawar nitin gadkari ajit pawar scsg

Photos: शरद पवारांकडून गडकरींचं कौतुक, मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी अन् गडकरींची अजित पवारांना विनंती; म्हणाले, “एकत्र येऊन…”

शरद पवार, नितीन गडकरी, अजित पवार राज्यस्तरीय साखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी एकाच मंचावर

June 4, 2022 19:11 IST
Follow Us
  • Sugar Conference 2022 Sharad Pawar Nitin Gadkari
    1/21

    वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथे आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेच्या आजच्या पहिल्याच दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी हजेरी लावली. (सर्व फोटो : पवन खेंग्रे तसेच संबंधित नेत्यांच्या ट्विटर हॅण्डवरुन साभार)

  • 2/21

    या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, साखर आयुक्त शेखर गायकवाड, खासदार श्रीनिवास पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे आदी उपस्थित होते.

  • 3/21

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या कार्यक्रमाला ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.

  • 4/21

    साखर कारखान्यांमध्ये साखर आता उपपदार्थ आणि इथेनॉल मुख्य उत्पादन झाले आहे. जागतिक बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमती पाहता यापुढे इथेनॉल निर्मितीवरच भर द्यावा लागणार आहे. देशाला दरवर्षी २९० लाख टन साखरेची गरज भासते, त्यामुळे तेवढी साखर निर्मिती केल्यानंतर उरलेल्या सर्व ऊसापासून इथेनॉल निर्मिती करावी लागणार आहे. तरच साखर उद्योग बदलत्या काळात टिकेल आणि देशाच्या विकासात मोठी आर्थिक भर घालेल, असे मत गडकरींनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

  • 5/21

    गडकरी म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते. मात्र, या राज्यातून देशाच्या इतर राज्यांमध्ये इथेनॉलची वाहतूक करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कारखान्याकडील इथेनॉलचा उठाव नियमित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पण ही तक्रार दूर करण्यासाठी इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांना न देता ते थेट तेल शुद्धीकरण करणाऱ्या कारखान्यांना दिले जाईल आणि त्याच ठिकाणाहूनच इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करून देशभरात वितरण केले जाईल.

  • 6/21

    देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) शेती क्षेत्राचे योगदान १२ टक्क्यांवर आले आहे. हे योगदान वाढवायचे असेल तर, ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी शेती आधारित ऊर्जा उद्योग वाढवला पाहिजे. अतिरिक्त ऊस, तांदूळ, गहू, मका आदी पासून इथेनॉल, बायो सीएनजी सारखे ऊर्जानिर्मितीचे स्त्रोत वाढवले पाहिजेत, असंही गडकरींनी म्हटलं.

  • 7/21

    देशातील १८८ लोकसभा मतदारसंघात ऊस उत्पादक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे कोणत्याही सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशाराच गडकरींनी अप्रत्यक्षपणे राजकारण्यांना दिला.

  • 8/21

    २०२०-२१ मध्ये भारताने सुमारे ५५ अब्ज डॉलर किंमतीच्या पेट्रोलियम पदार्थांची आयात केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर परकीय चलन तेल आयातीवर खर्च करणे देशहिताचे नाही. त्यामुळे तेल आयात कमी करण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. त्यासाठी आपल्याला इथेनॉल निर्मिती वाढवली पाहिजे. बायो सीएनजीवर भर दिला पाहिजे, असं गडकरींनी म्हटलं.

  • 9/21

    नजीकच्या भविष्यात देशातील सर्व दुचाकी, चार चाकी गाड्या, ट्रक आणि रेल्वे सुद्धा बायो सीएनजी किंवा इथेनॉलवर चालविण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. फेक्स इंजिनचे तंत्रज्ञान वापरून सर्व गाड्या शंभर टक्के इथेनॉलवर चालवायच्या आहेत. त्यासाठी देशातील सुमारे ५५० कारखान्यांनी उसापासून साखरे ऐवजी इथेनॉल निर्मिती केली पाहिजे. ब्राझील सारखा साखर निर्मितीत आघाडीवर असणारा देश जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा साखरेऐवजी इथेनॉल निर्माण करतो आणि तेलाच्या किमती घसरल्या तर साखर साखर निर्माण करतो. जे ब्राझील करू शकतो, तेच आपणही केले पाहिजे. जागतिक बाजारातील बदल लक्षात घेऊन बाजाराला काय अपेक्षित आहे, त्याप्रमाणे आपण सध्या साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती करून कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजेत. मागील पंधरा वर्षे कारखाने तोट्यात होते. यंदा पहिल्यांदाच हे कारखाने फायद्यात आलेले आहेत, असा उल्लेख गडकरींनी आपल्या भाषणात केला.

  • 10/21

    इंडियन ऑइलच्या वतीने पुण्यात लवकरच इथेनॉलचे पेट्रोल पंप सुरू करण्याचे नियोजन आहे. रशियाने संशोधन करून इथेनॉलची उपयोगिता पेट्रोलइतकीच वाढवली आहे. त्यामुळे गाड्यांना पेट्रोल इतकेच इथेनॉल पासून ऑवरेज पडते. त्यामुळे कारखान्यात तयार झालेले इथेनॉल आपल्याच जिल्ह्यात विकले जाईल, अशी यंत्रणा भविष्यात निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे कारखान्याने भविष्यात इथेनॉल निर्मितीवरच भर दिला गेला पाहिजे. उसाच्या रसापासून थेट दर्जेदार इथेनॉल तयार केले पाहिजे, असंही गडकरी म्हणाले.

  • 11/21

    यंदा विक्रमी ऊस लागवड झाले आणि विक्रमी उत्पादन ही निघाले. त्यामुळे शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनला. अनेक शेतकऱ्यांनी आपले उसाचे फड पेटवून दिली आहेत, अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावरून फिरणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षांचे वाढीव क्षेत्र गृहीत धरून कारखाने सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणीचे नियोजन करावे. हार्वेस्टर साठी राज्य सरकारने एखादी चांगली योजना सुरू करावी, त्याला केंद्र सरकार मदत करेल. पण शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

  • 12/21

    विदर्भातील शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक शाखा सुरू केली जाईल. या शाखेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले बेणे दिले जाईल. साखर कारखान्यांना उच्च आणि आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याचा विचार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

  • 13/21

    देशाच्या साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा विक्रमी साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार ९० लाख टनांपेक्षा जास्त साखर निर्यात होऊ शकेल, असा अंदाज आहे. या एकूण साखर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ५० टक्के आहे, ही बाब अत्यंत समाधानकारक आहे. महाराष्ट्रात आज आखेर १३७० लाख टन गाळप झाले असून १६८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सुमारे पंधरा लाख टन उसाचा वापर इथेनॉल साठी करण्यात आला आहे. राज्याचा विचार करता ६४ लाख टन साखर निर्यात तिचे करार झाले असून, ४० लाख टनाची साखर राज्यातून निर्यात झाली आहे, असेही पवार म्हणाले.

  • 14/21

    आपल्या उद्घाटनपर भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पण, बाजारातील मागणीनुसार बदलण्याची गरज आहे. अडचणीच्या काळात राज्य सरकार सक्रियपणे साखर उद्योगाच्या पाठीशी असेल. मात्र या उद्योगांनेही बाजारातील मागणीनुसार स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलं.

  • 15/21

    अनेक कारखाने दर्जेदार पद्धतीने काम करत आहेत. मात्र अनेक सहकारी कारखाने अडचणीत आले आहेत. हे सहकारी कारखाने अडचणीत का येतात, याचा अभ्यास करून प्रशासकीय पातळीवर काही बदल करण्याची गरज आहे. ते बदल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पुढाकार घेऊन करावेत. बदलत्या काळानुसार साखर उद्योगापुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अनेक परवानग्यांची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्रीय स्तरावर ज्या काही अडचणी आहेत, त्या मिळवण्यासाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली.

  • 16/21

    इथेनॉलवरील गाड्या बाजारात येणार असल्यामुळे गाडीत किती साखर टाकली, असा प्रश्न भविष्यात विचारला जाऊ शकतो, अशी मिश्किल टिप्पणीही ठाकरे यांनी केली.

  • 17/21

    “आज केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील उसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहे याचा मला मनापासून आनंद आहे,” असं म्हणत शरद पवारांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.

  • 18/21

    “सर्वांच्या प्रयत्नाने आपण साखर उद्योगात यश मिळवलं आहे. साखर उद्योगात महाराष्ट्र आता एक नंबर आहे. या क्षेत्रात प्रगती झाली याचा मला आनंद आहे, पण आता पुढील दिशा शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या अडचणीतून मार्ग काढणं गरजेचं आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

  • 19/21

    “मी पंतप्रधान मोदींच्या मागे लागून पुण्यासाठी इथेनॉलचे तीन पंप मिळवले. पण त्यामधून एक थेंबही इथेनॉल विकलं गेलेलं नाही. मी अजित पवार यांना विनंती करतो की एकत्र येऊन बजाज कंपनीसोबत बैठक घेऊयात,” असंही नितीन गडकरी म्हणाले. बजाज कंपनीसोबत इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बनवण्यासंदर्भात सरकारी पातळीवर कंपनीशी चर्चा होण्याची गरज असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.

  • 20/21

    पुणे रिंग रोडचा उरसे ते केळवाडी हा ६८ किमी रस्ता एनएचएआय (NHAI)च्या माध्यमातून करण्याबाबत या भेटीदरम्यान अजित पवार आणि नितीन गडकरींची चर्चा झाली.

  • 21/21

    पुणे – औरंगाबाद आणि पुणे – बंगलोर या नवीन ग्रीनफिल्ड रस्त्यांच्या संदर्भातही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं गडकरींनी ट्विटरवरुन फोटो पोस्ट करत सांगितलं.

TOPICS
अजित पवारAjit Pawarनितीन गडकरीNitin GadkariपुणेPuneपुणे न्यूजPune Newsशरद पवारSharad Pawar

Web Title: Sugar conference 2022 sharad pawar nitin gadkari ajit pawar scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.