-
रामदास आठवलेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यात आणि देशात सध्या चर्चेत असलेल्या विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. अगदी नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडण्यापासून राज्यातील शिवसेनेच्या फुटीपर्यंत सर्वच मुद्द्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
-
रिपब्लिकन पक्ष बॅलन्स ऑफ पॉवर करणारा पक्ष आहे. रिपाइंची मतं ज्यांच्या बाजूला जातात, त्यांना सत्ता मिळते. महाराष्ट्रात माझा पक्ष ज्यांच्या बाजूला गेला, त्यांना सत्ता मिळाली हा अनुभव आहे, असं ते म्हणाले.
-
अजून २४ मंत्र्यांचा शपथविधी बाकी आहे. त्यात रिपाइंला देखील मंत्रीपद मिळावं, अशी आमची मागणी आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये देखील एक जागा रिपाइंला मिळावी. दोन-तीन महामंडळांची चेअरमन पदं आणि उपाध्यक्षपदं आपल्याला मिळायला हवी. रिपाइंला यंदा सत्तेत चांगला सहभाग मिळेल, असं म्हणत त्यांनी राज्यात सत्तेत सहभाग मिळण्याची आशा व्यक्त केली.
-
२०२४मधल्या निवडणुका भाजपा, शिवसेना, रिपाइं युतीत आम्ही निवडणुका लढवू. आम्हाला जवळजवळ २०० जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-
शिंदे-फडणवीसांची जोडी काम करत आहे. विस्तारावरून तक्रार होती. आता मंत्र्यांचा शपथविधी झालाय. बाकीच्यांचा पुढच्या महिन्यात होईल. त्यात रिपाइंला संधी मिळेल अशी आम्हाला आशा आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
-
नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गांची कामं देशभरात चांगल्या प्रकारे होत आहेत. काँग्रेसच्या काळातही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चांगले रस्ते तयार झाले नव्हते. पण मोदींच्या काळात गेल्या ८ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे, असं म्हणत त्यांनी नितीन गडकरींनाही चांगल्या कामाचं प्रमाणपत्र दिलं.
-
घराणेशाही असता कामा नये अशी भूमिका नरेंद्र मोदींची आहे. देशभरात त्यांचा डंका आहे. त्यांचं काम सगळ्यांना आवडत आहे, अशा शब्दांत त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर भूमिका मांडली.
-
८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आयुष्मान भारत योजनेचा फायदा अनेक लोकांना मिळाला आहे. जनधन योजनेचे ४५ कोटींहून जास्त खाती उघडण्यात आली आहेत. ३५ कोटी लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज मिळालं आहे. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला १० टक्के आरक्षणाचा निर्णय माझ्या मंत्रायलयाने घेतला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
-
हॅलो म्हणण्यापेक्षा वंदे मातरम म्हटलं तर देशाशी आपलं नातं किती अतूट आहे, हे दाखवण्याची आपल्याला संधी आहे. त्यामुळे वंदे मातरम म्हणणं चांगलं आहे. मुनगंटीवारांच्या भूमिकेला विरोध करण्याचं कारण नाही, असं म्हणत रामदास आठवले यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.
-
नितीश कुमार हे लालूप्रसाद यादव यांच्यासोबत होते. तिथून ते मोदींसोबत आले. आता ते तिथून परत मोदींसोबत येतील. तिथे वाद झाल्यानंतर त्यांना दुसरा मार्ग नाही. नितीशकुमार गेल्यामुळे भाजपाचं किंवा एनडीएचं काहीही नुकसान होणार नाही. पण नितीशकुमार यांनी धोका दिला, अशा शब्दांत त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली.
-
भाजपा मित्रपक्षांना संपवते हा आरोप चुकीचा आहे. माझा पक्ष संपवण्यापेक्षा तो कसा मजबूत होईल यासाठी भाजपाचा पूर्ण पाठिंबा आहे. बिहारचं सरकार फारकाळ चालेल असं मला वाटत नाही. नितीशकुमार आले नाहीत, तरी त्यांचे आमदार फुटती, असं म्हणत माझ्या पक्षाच्या वाढीला भाजपाचा पाठिंबा असतो, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.
-
नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार अशा अनेक लोकांचे चेहरे मोदींच्या समोर असतील, तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही. मी त्यांच्या पाठिशी असताना त्यांना काळजी करण्याचं कारण नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर विश्वास व्यक्त केला.
-
खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे असा निकाल निवडणूक आयोगाकडून येण्याची शक्यता आहे. आमच्या पक्षात गवई, कवाडे आणि मी आम्ही तिघे एकत्र असताना आमच्या पक्षात फूट पडली. मी राष्ट्रवादीसोबत आणि इतर दोघे काँग्रेससोबत गेले. तेव्हा निवडणूक आयोगाकडे आमचा वाद गेला. तेव्हा दोन खासदार आमच्यासोबत आहेत असं सांगत आमचं निवडणूक चिन्ह गवईंना मिळालं होतं. इथे दोन तृतीयांश आमदार आणि खासदार शिंदेंकडे आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्ह त्यांना मिळेल. उद्धव ठाकरेंना दुसरं कुठलंतरी चिन्ह घ्यावं लागेल, असं सांगताना त्यांनी शिंदेंच्या बाजूनेच या प्रकरणाचा निकाल लागेल असा विश्वास व्यक्त केला.
-
एकनाथ शिंदेंनी दोन तृतियांशपेक्षा जास्त लोक आपल्या बाजूने वळवले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे आणि बरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.
‘खरी’ शिवसेना आणि ‘बरी’ शिवसेना… रामदास आठवलेंनी पत्रकार परिषदेत मांडली सविस्तर भूमिका!
पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी मांडली भूमिका!
Web Title: Ramdas athavle on hello controversy eknath shinde uddhav thackeray pmw