-
रायगड जिल्ह्यातील तळीये गावाला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळली. विध्वंस झाला. या विध्वंसाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पाहणी केली. तळीये, चिपळूणच्या दौऱ्यावर निघण्याआधी राणे यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत", असं राणे म्हणाले होते. (छायाचित्र। भाजपा ट्विटर हॅण्डल)
-
नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासह तळीय गावाला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, "अतिशय दुर्दैवी घटना आहे. नैसर्गिक आपत्ती असल्यानं मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. ४४ मृतदेह सापडले आहेत. इतरांचा शोध घेतला जात आहे."
-
"बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याकडून मदत देण्यात आली असली, तरी या मदती पलिकडे आणखी मदत होणार नाही, असं नाही. त्यांचं पूनर्वसन पंतप्रधान आवास योजनेतून केलं जाईल. त्यांना चांगली आणि पक्की घरं दिली जातील. राज्य व केंद्र सरकार दोघंही ही वसाहत पुन्हा उभारतील", असं राणे म्हणाले.
-
"एकच गोष्ट अशी आहे जी आम्हाला परत आणता येणार नाही, ती म्हणजे मृत्यू पावलेली माणसं! शासकीय यंत्रणा चांगलं काम करत आहेत. त्यामुळे या आपत्तीतून सुदैवानं जी माणसं वाचली, त्यांना सांभाळण्याचं काम आम्ही करू. या माणसांच्या मागण्या सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रांत अधिकारी नेमण्याची सूचना केली आहे. काही लोकांनी तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्याची मागणी केलीये. त्यांचं त्यांच्या मनाप्रमाणे पुनर्वसन केलं जाईल", असं राणे यांनी सांगितलं.
-
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या नुकसानीची माहिती दिली जाईल. मी येतानाच पंतप्रधानांशी बोललो आहे. त्यांनी मला अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. कोकणात कायमस्वरूपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करू", अशी माहिती राणे यांनी यावेळी दिली.
-
तुळीयेतील दुर्घटना सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचं तसंच वेळेत मदत न पोहोचल्याचा मुद्दा चर्चिला जात आहे. यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी राणे यांना प्रश्न केला. राज्य सरकारने खबरदारी घेतली असती, तर दुर्घटना टाळता आली असती का? असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला.
-
या प्रश्नावर बोलताना राणे यांनी सामंजस्याची भूमिका मांडत ठाकरे सरकारची पाठराखण केली. "आपण असे प्रश्न विचारू नका की त्यातून वाद होईल. या घाटातील डोंगर कोसळेल याची कुणालातरी कल्पना आली होती का? नाही ना… त्यामुळे कुणावर आरोप करण्याची ही वेळ नाहीये. घडलेल्या घटनेमधील जे दुःखात बुडालेले आहेत; त्यांचे प्रश्न आपण आधी सोडवू. नंतर बाकीचं बघू… वादाचे मुद्दे आतातरी विचारू नका", असं आवाहन करत राणे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली.
-
"केंद्र सरकारकडून आधीच मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी मला पाहणीसाठी पाठवलं आहे. त्यांनी मला पाहणी करून अहवाला देण्याचं सांगितलं आहे. सध्या तरी मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचं पुनर्वसन करण्याचं काम केलं जात आहे," असं राणे यांनी सांगितलं.
-
यावेळी राज्य सरकारशी यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. "राज्य सरकारची लोक भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत", अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
-
पुरग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर नारायण राणे हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. त्यांना पुरस्थितीची माहिती देऊन अहवालही सादर करणार आहेत. माध्यमांशी बोलतानाच राणेंनी ही माहिती दिली.
Taliye landslide : नारायण राणेंकडून ठाकरे सरकारची पाठराखण; म्हणाले…
तळीये, चिपळूणच्या दौऱ्यावर निघण्याआधी राणे यांनी ट्वीट करून याची माहिती दिली.
Web Title: Mahad taliye latest news landslides and house collapses mahad taliye rescue operations narayan rane uddhav thackeray visit bmh