संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीमधील विकास किंवा पवार कुटुबियांच्या नावे भाजपची मंडळी नाके मुरडत असली तरी वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कृषी प्रदर्शन आयोजित करण्याच्या उद्देशाने बारामतीमधील पवारांच्या संस्थेची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी मुंबईत आमदार रोहित पवार यांच्याशीही चर्चा केली होती.

बारामतीबद्दल भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या मनात नेहमीच अढी असते. अलीकडे तर बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांचे अलीकडेच बारामती मतदारसंघात दौरे झाले. बारामतीमधील पवारांचे वर्चस्व मोडित काढण्याकरिता भाजपचे विविध प्रयत्न सुरू असतात. पाण्याच्या प्रश्नावरूनही कुरापती काढल्या जातात.

हेही वाचा… सोलापुरात दोन्ही काँग्रेसमधील वाकयुद्धात सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढली

राज्य भाजपमधील नेते बारामतीला दुषणे देत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी बारामतीमध्ये येऊन विकासाबदद्दल शरद पवार यांचे कौतुक केले होते. राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिवसभर बारामतीलमधील कृषी प्रदर्शन आणि विविध संस्थांची पाहणी केली. चंद्रपूरमध्ये कृषी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याची सुधीरभाऊंची योजना आहे. यासाठी त्यांनी बारामतीमधील विज्ञान प्रदर्शनाची माहिती घेतली. तसेच चंद्रपूरमध्ये हे प्रदर्शन आयोजित करायचे असल्याने तेथील जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱयांना सोबत बारामतीमध्ये आणले होते.

हेही वाचा… Maharashtra News Today Live: मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल; कसब्यातून आनंद दवेंची थेट राज ठाकरेंनाच ऑफर

मुनगंटीवार यांच्या दौऱयाच्या वेळी रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार हे उपस्थित होते. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन संशोधनाची माहिती घेतली. या संशोधनाचा उपयोग विदर्भ आणि मराठावाड्यासह राज्याच्या सर्व भागांत झाला तर शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न सुटतील आणि समृद्धीकडे वाटचाल होईल. निंमंत्रणाबद्दल केंद्राचे प्रणेते राजेंद्र पवार यांचे अभिनंदन, असे ट्टवीटही मुनगंटीवार यांनी केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp minister sudhir mungantiwar attracted by development shown by baramati based organization print politics news asj