Bihar Assembly elections 2025 बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दोन टप्प्यांत येथील निवडणुका होणार आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु, असे असले तरी या निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
महाआघाडीत मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरु आहे, तर एनडीएतही जागावाटपाचा मुद्दा पेटल्याचे पाहायला मिळत आहे. एनडीएतील केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी जागेचा योग्य वाटा मागितला आहे. मुख्यमंत्रीपदाचा स्पष्ट चेहरा नसणे, आघाड्यांमधील नेतृत्वावरचा संभ्रम आणि जुन्या नेत्यांमध्ये, वारसांमध्ये सतत चाललेला संघर्ष बिहारच्या राजकारणात चर्चेचा मुद्दा ठरत आहे. या उलथापालथीचे नेमके कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात…
‘हो न्याय अगर तो आधा दो…’
केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी सोशल मिडीयावर एक काव्यात्मक पोस्ट करत जागावाटपाच्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यांचा पक्ष ‘हिंदुस्तानी आवाम मोर्चा’ (एचएएम)ने एकेकाळी राज्यातील २४३ पैकी निम्म्या जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचा उल्लेख करताना मांझी म्हणाले की, युतीच्या एकजुटीच्या भावनेतून ते १५ जागांवर समाधान मानण्यास तयार आहेत. रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या ‘रश्मिरथी’तून प्रेरणा घेत त्यांनी महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने केलेल्या न्यायाच्या आवाहनाचा उल्लेख ‘एक्स’वर केला. त्यांनी लिहिले, “हो न्याय अगर तो आधा दो” न्यायासाठीची ही विनंती भाजपाला उद्देशून होती, असे मानले जात आहे.
मांझी यांनी पुढे म्हटले की, जर पूर्ण न्याय मिळू शकत नसेल, तर एचएएम १५ गावांवर म्हणजेच १५ मतदारसंघांवर समाधानी राहील आणि नातेवाईकांविरुद्ध शस्त्र उचलणार नाही, असे म्हणत त्यांनी एनडीए युतीसाठीचे आपले समर्पण अधोरेखित केले. जागावाटपावर विचारविनिमय करण्यासाठी भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान आणि विनोद तावडे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर लगेचच हे वक्तव्य आले.
महाआघाडीतील गोंधळ
गेल्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवलेल्या सीपीआय (एम-एल) लिबरेशन या पक्षाला १९ जागांवर लढण्याचा प्रस्ताव पुरेसा वाटला नाही. २०२० मध्ये, सीपीआय (एम-एल) ने लढवलेल्या १९ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांनी सुरुवातीला ४० जागांची मागणी केली होती, नंतर ती ३० पर्यंत खाली आणली, अशी माहिती पीटीआयने एका पक्ष स्रोताद्वारे दिली. पक्षाने आपल्या मागण्या फेटाळल्यास आपण ठोस भूमिका घेऊ, असाही इशारा त्यांनी दिला. २०२० मध्ये, आरजेडीने १४४ जागा लढवल्या आणि ७५ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ७० जागा लढवून १९ जागांवर विजय मिळवला.
चिराग पासवान यांना एनडीए कडून काय हवे आहे?
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी वाढत्या गुन्हेगारीवरून मित्रपक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू (JDU) शासित बिहार प्रशासनावर टीका केल्यामुळे आणि ‘अबकी बारी, युवा बिहारी’ या त्यांच्या घोषणेमुळे ते चर्चेत आहेत. कारण- यावेळी बेरोजगारी हा विरोधी पक्षाचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी २०२० मध्ये एनडीए सोडली होती, ज्याने जेडीयूला मोठा धक्का बसला होता.
मात्र, त्यावेळी चिराग पासवान यांनी लढवलेल्या १३५ हून अधिक जागांपैकी केवळ एक जागा जिंकण्यात त्यांना यश आले. यावेळी, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे नाकारली आहे, मात्र त्यांच्या पक्षाचे लक्ष अनुकूल मानल्या गेलेल्या विशिष्ट मतदारसंघांवर आहे. त्यांनी २०२४ मध्ये जिंकलेल्या पाच लोकसभा मतदारसंघांपैकी प्रत्येकात काही विधानसभा जागांची मागणी केली आहे, असे एका पक्ष स्रोताने पीटीआयला सांगितले आहे.
तेजस्वी यांच्या मुख्यमंत्रीपदावरून वाद
तेजस्वी यादव आरजेडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, पण ‘इंडिया’ आघाडीचा नाही, निदान आत्ता तरी नाही, अशा आशयाची भूमिका काँग्रेसने मांडली आहे. काँग्रेस नेते उदित राज म्हणाले, “तेजस्वी यादव आरजेडीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, पण ‘इंडिया’ आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सामूहिकरित्या ठरवला जाईल.” तेजस्वी यादव यांनी ‘एक्स’वर एक पोस्टर पोस्ट केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. “जेव्हा तेजस्वी मुख्यमंत्री होतील, तेव्हा बिहारमधील आमच्या घरातील कोणताही भाऊ किंवा बहीण बेरोजगार राहणार नाही,” असे त्या पोस्टरवर लिहिले होते. भाजपाने यावर लगेच प्रतिक्रिया देत तेजस्वींवर टीका केली की, “ते राहुल गांधींना अनेकवेळा पंतप्रधान म्हणाले, पण राहुल गांधी त्यांना मुख्यमंत्री उमेदवार म्हणाले नाहीत.”
भाजपाचे खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “ते स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सादर करत आहेत, पण त्यांच्या आघाडीतील लोक तसे म्हणत नाहीत. त्यांनी राहुल गांधींना अनेकवेळा पंतप्रधान म्हटले, पण राहुल गांधी त्यांना मुख्यमंत्री उमेदवार म्हणाले नाहीत. आघाडी सोडा, आता कुटुंबातही परिस्थिती वेगळी आहे. लालू यादव आपल्या मुला-मुलींमध्ये द्विधा मनःस्थितीत आहेत. कुटुंबात संकट आहे,” असे ते पुढे म्हणाले.