Top Five Political News in Today : आज दिवसभरात मुंबईसह महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांना खडसावलं, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांचे कान टोचले. आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथील आम सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बोगस कागदपत्राद्वारे जात प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होणार असा इशारा मंत्री राधाकृष्ण विखेंनी दिला, तर आगामी मुंबईसह ठाणे महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

मुख्यमंत्री फडणवीसांनी पडळकरांना फटकारलं

भाजपाचे आमदार गोपीचंद पडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या दिवंगत वडिलांना उद्देशून एक वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला असून त्याचे राजकीय पडसाद उमटले. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी आमदार पडकर यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजकीय संस्कृती जपायला हवी असा सल्ला पडकरांना दिला. याबाबत माध्यमांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, “गोपीचंद पडळकर यांचे विधान योग्य असल्याचे माझे मत नाही. कुणाच्याही वडील आणि कुटुंबाबाबत चुकीचे भाष्य करणे योग्य नाही. त्यासंदर्भात मी आमदार पडळकर यांच्याशी बोलून त्यांना समज दिली आहे. मला शरद पवार यांचाही फोन आला होता. पडळकरांच्या विधानाचे आम्ही समर्थन करीत नाही हे मी त्यांना सांगितले,” असे फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोचले मंत्र्यांचे कान

पक्षाचे आदेश पाळले नाहीत तर खुर्ची सोडावी लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना दिला. आज नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांनी पक्षाची भविष्यातील दिशा आणि विस्तारासाठीच्या रणनीतीबाबत भूमिका मांडली. तसेच पक्षातील शिस्तीबाबत पदाधिकारी आणि थेट मंत्र्यानाही खडे बोल सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराची सुरुवात झेंडावंदन करून झाली. यावेळी काही मंत्री आणि पदाधिकारी उशीरा आले. “पुढच्या वेळेस एखाद्या कार्यक्रमाची वेळ असेल तर त्याचवेळेला दरवाजा बंद करायचा विमान टेकऑफसाठी जसे वेळेचे कडक नियम पाळले जातात, तसेच नियम यापुढे पक्षात पाळायला हवेत,” असे म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. “ज्या नेत्यांना पालमंत्रिपद मिळाले आहे, त्यांना त्या जिल्ह्यात जावे लागेल. तिथे गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, आमदारांना बरोबर घेऊन लोकांमध्ये फिरावे लागेल. कधी कधी पालकमंत्री त्या जिल्ह्यात गेल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे बघतही नाही. माझ्यासह सर्वांना चुका दुरूस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची मोकळी करावी लागेल”, असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी दिला.

आणखी वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये नाराजी? पक्षातील नेत्यांना नेमकी कशाची चिंता?

आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गुरुवारी कर्जतमध्ये आयोजित केलेल्या आमसभेत त्यांनी सर्वच शासकीय विभागांविरोधात तक्रारींचा पाऊस पडला. कधी समजून सांगत तर कधी कारवाईचा धाक दाखवत आमदार पवार यांनी अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांच्या अडचणी सोडवल्या. प्रश्न उपस्थित करणारा कार्यकर्ता जर वेगळ्या पद्धतीने बोलत असेल तर त्यालाही खडेबोल सुनावले. नागरिकांच्या तक्रारींवर आमदार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून तत्काळ भरपाई देणे, पंचनाम्यातून कोणताही शेतकरी वगळू नये, कुकडी व सीना प्रकल्पाच्या काठावरील जमिनींची समस्या, शेतीसंबंधित कागदपत्रांच्या प्रक्रियेतील अडचणी, यांसह वैयक्तिक लाभाच्या योजनांतील अडवणूक आणि त्यासाठी होणारी पैशांची मागणी आदी तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. आमसभेत सर्वाधिक चर्चा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्याची भरपाई या विषयावर झाली. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारच्या मानगुटीवर बसून नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे रोहित पवार म्हणाले.

बोगस कागदपत्राद्वारे जात प्रमाणपत्र दिल्यास कारवाई : राधाकृष्ण विखे पाटील

बोगस कागदपत्राच्या आधारे कुणालाही प्रमाणपत्र दिल्याचे लक्षात आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जलसंपदा तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी दिला. शिर्डी येथे गुरुवारी माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, “कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. बोगस दाखल्यांच्या आधारे अशी जात प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशी बोगस दाखल्यांच्या आधारे प्रमाणपत्र वाटप झाल्याचे लक्षात आल्यास ती तत्काळ रद्द होतील. तसेच यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही सरकारची भूमिका आहे आणि भुजबळ यांनीसुध्दा तीच मागणी केली आहे.” मराठा समाजाच्या संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या परिषदेच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांच्याकडून काही सूचना आल्यास त्याचे स्वागत करू असे स्पष्ट केले. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील समाधानी असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

हेही वाचा : Visual Storytelling : मतचोरीच्या आरोपानंतर काँग्रेसची मोठी खेळी; भाजपा सरकारविरोधात अविश्वास ठराव, कारण काय?

मुंबईसह ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार: एकनाथ शिंदे

आगामी निवडणुकीत मुंबईसह ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात गुरुवारी पालघरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हे संकेत दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची, कामाची उंची मोजण्याचे काम कोणी करू नये. कोत्या वृत्तीच्या लोकांना दिघे अजिबात कळणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपावर बोलताना, “आधी पुरावे सादर करा मतचोरीचे आरोप करा असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. असे असतानाही राहुल गांधी सर्रापणे मतचोरीचा आरोप करीत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ईव्हीएमवरील मतदान कोणाच्या काळात झाले, याचा अभ्यासही त्यांनी करावा”, असा सल्ला शिंदे यांनी दिला.