Latest News on Maharashtra Politics Today : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत निधीवरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता, त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ठाणे शहरात राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल वक्तव्य केले आहे, ज्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गृहमंत्री अमित शहांनी मुनगंटीवार यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे, त्यावरून चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील या पाच महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे शनिवारी (११ ऑक्टोबर) हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता आणि खुर्ची गेली, तेव्हा हंबरडा फोडला आणि आता पुन्हा हंबरडा मोर्चा काढत आहेत,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. जमीन वाहून गेलेली, शेती खरडून गेलेली, घरांची पडझड झालेली पाहिली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना पाहून ठरवले की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे, म्हणूनच आम्ही ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि दहा हजार रुपयांची तात्काळ मदत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केले जात आहे. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खऱ्या अर्थाने काम केले आहे, आमचे ध्येय त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे आहे,” असेही ते म्हणाले.

ठाकरे बंधू एकत्र

ठाण्यात एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरे बंधू अखेर एकत्र येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर शिंदेंविरोधात येण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी, महापालिकेतील भ्रष्टाचार तसेच इतर प्रश्नांवर सोमवारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेकडून मोर्चा काढला जाणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मुख्यमंत्र्यांवर टीका

हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत २ सप्टेंबर रोजी शासनाने जारी केलेला जीआर (शासन निर्णय) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील ओबीसी-मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आणि दोन्ही समाजातील तेढ यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी विधान केले की, “देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात. जसे नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला, त्या शांत पद्धतीने देवेंद्र फडणवीस भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहातात. या सर्वांमध्ये त्यांनी हा खेळ खेळू नये आणि लवकर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.”

संग्राम जगतापांच्या विधानावर अजित पवारांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले, “यंदाच्या दिवाळीत खरेदी करताना ती फक्त हिंदूंकडूनच करा.” यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, “त्यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून कुठलाही खासदार-आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील, तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाहीत.”

राज्यात भाजपामध्ये महत्त्वाची घडामोड

विदर्भातील भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने दिल्लीत बोलावले आहे, त्यामुळे मुनंगटीवार-अमित शाह भेटीत नेमके काय ठरते याकडे भाजपासह इतरही पक्षांचे लक्ष लागले आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला यश मिळाल्यावर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते दिले जाईल असा अंदाज होता, मात्र त्यांना मंत्रीच करण्यात न आल्याने ते नाराज आहेत, त्यांच्या समर्थकांनीही याबाबत स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली आहे. आता या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.