सांगली : इस्लामपूर म्हणजेच उरुण ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचा चेहरा जाहीर करण्यासाठी चर्चेच्या फेर्‍या सुरू असतानाच माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे यांचे नाव जाहीर करून बाजी मारली आहे. महायुती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्‍चित करण्यातच गुंतली आहे . मात्र सर्वांचे विश्वनाथ डांगे यांच्या नावाला सहमतीचे प्रयत्न सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे.

इस्लामपूर नगरपालिका हा आमदार पाटील यांचा गड मानला जातो. १९८५ मध्ये नगरपालिकेची सूत्रे आमदार पाटील यांच्या गटाकडे आली होती. मात्र, नउ वर्षापुर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार पाटील यांच्या विरोधकांनी एकत्र येउन स्थापन केलेल्या विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली होती.

यावेळी विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी वगळता अन्य सर्वजण म्हणजे, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती, शिवसेना हे एकत्र होते. मात्र, नगरसेवक निवडीत विकास आघाडी व राष्ट्रवादीने बरोबरी साधल्याने अपक्ष निवडून आलेल्या दादासाहेब पाटील यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती.

आता मात्र गेल्या ९ वर्षात पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. पाटलांच्या गडावर त्यांचा पराभव झाला असला तरी मताधिक्य कमी करण्यात त्यांना यश आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची विभागणी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या ठिकाणी आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी लक्ष घातले आहे. तसेच भाजपलाही या ठिकाणी आमदार पाटील यांच्या गडाला खिंडार पाडायचे आहे. मात्र, यासाठी आमदार पाटील यांचे विरोधक एकत्र येणे गरजेचे आहे. याचठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत.

आमदार पाटील गटाच्या विरोधातील उमेदवार निश्‍चित करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सर्व प्रमुख नेत्यांची बैठकही घेतली. मात्र, सगळे घोडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर अडले आहे. शिवसेना (शिंंदे) गटानेही या पदावर दावा केला आहे, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही या पदावर आपलाच उमेदवार हवा असा आग्रह धरला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून एकमत अद्याप झालेले नाही. काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी केलेले जेष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचे चिरंजीव विश्वनाथ डांगे यांच्या नावाला सर्वसहमती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वानी एकसंघपणे निवडणुक लढविण्यावर मात्र एकमत सध्या तरी झाल्याचे दिसत आहे. रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत आणि माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनी नगरपालिकेबरोबरच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व जिल्हा बँक संचालक राहूल महाडिक या बंधूनीही भाजपसाठी पेरणी सुरू केली आहे. नगरपालिका निवडणुकांची घोषणा पुढच्या आठवड्यात होईल या दिशेने राजकीय कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे.

मागील निवडणुकीवेळी झालेल्या चुका टाळण्यास आमदार पाटील प्राधान्य देतील असे दिसते. गेले काही दिवस आपला बालेकिल्ला अबाधित राखण्यावर त्यांचा भर आहे, तर विरोधकामध्ये ऐक्य घडविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात कोण दोन पावले माघार घेतो हे येत्या काही दिवसाताच दिसेल. मात्र, नगराध्यक्षपदाचा चेहरा जाहीर करून आमदार पाटील यांनी विरोधकावर नमनलाचा बाजी मारली आहे.