अलिबाग– विधानसभा निवडणूकी पाठोपाठ रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महायुतीत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नगर पालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटासोबत आघाडी करण्याची घोषणा केली आहे. कर्जत परिवर्तन विकास आघाडी असे या आघाडीला नाव देण्यात आले आहे. दोन्ही पक्षाच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे वर्षभरानंतरही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुटू शकलेला नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महायुतीचे भवितव्य काय असणार याची चर्चा सुरू झाली होती.

शिवसेना शिंदे गटाने महायुतीमधील वाद बाजूला ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस समोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. ज्या पक्षाचा जिथे आमदार त्याने तिथल्या जागा लढवाव्यात आणि उरलेल्या जागा तिन्ही पक्षांनी वाटून घ्याव्यात असा फॉर्मुला शिवसेना शिंदे गटाने मांडला होता. मात्र खासदार सुनील तटकरे यांनी या प्रस्तावाची खिल्ली उडवत तो धुडकावून लावला होता, जिल्ह्यात आमच्या पक्षाच्या ताकद मोठी आहे. आणि त्यामुळे जागा कशा मिळवायच्या हे आम्हाला माहित आहे असा सुचक इशारा तटकरे यांनी दिला होता. यानंतर कर्जत मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची आघाडी होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली आहे.

सध्या कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी शिवसेना शिंदे गटाचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि महाड विधानसभा मतदारसंघातही अशी आघाडी होण्याची शक्यता आहे. कर्जत मधील रेडीसन ब्ल्यू रिसॉर्टमध्ये दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितिन सावंत, तालुका प्रमुख बाजीराव जाधव यांच्यासह दोन्ही पक्षांचे जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर कर्जत मतदारसंघातील तीन नगरपालिका, सहा जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समितीच्या जागा एकत्रितपणे लढविण्याबाबत निर्णय घेतला गेला.

कर्जत परिवर्तन विकास आघाडी आम्ही स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून आम्ही आगामी निवडणूकांना सामोरे जाणार आहोत. त्यात जे पक्ष सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. कर्जतचे आमदार नेहमी बोलतात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही. त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणूकांना सामोरे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. – सुधाकर घारे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट यांचे मनोमिलन झाल्याचे आम्ही बघितले, सत्तेसाठी ते असे प्रयोग करत राहतात. पण आम्ही महायुतीसाठी प्रयत्न करत असतांनी राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेणे योग्य नाही, तटकरेंनी असे प्रयोग थांबवावेत. – महेंद्र दळवी आमदार शिवसेना