Sharad Pawar-Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट लवकरच एकत्रित येणार अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा पुण्यात एकाच व्यासपीठावर दिसून आले. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर उद्योग व कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत आयोजित एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)च नेते जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली, असं उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीआधी दोन्ही पक्षांसमोर कोणकोणती आव्हानं असणार ते जाणून घेऊ…

वसंतदादा संतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी झालेल्या कार्यक्रमाला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आरोग्यंत्री राजेश टोपे व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील वगळता सर्व नेते बाहेर पडले. यावेळी तीनही नेत्यांमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. गेल्या ५५ दिवसांत काका-पुतण्याची ही पाचवी भेट आहे. दरम्यान, हा एक सार्वजनिक कार्यक्रम होता त्यामुळे या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ लावू नये, असं दोन्ही गटांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “या बैठकीत तज्ज्ञांनी साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भूमिकेबाबत आणि परिणामांबाबत चर्चा केली. एआय ही संकल्पना आता वास्तवता झाली आहे, त्यामुळे आपल्यालाही त्याबरोबर पाऊल टाकत पुढे जावे लागेल.” दरम्यान, अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असली तरी, शरद पवार यांनी मात्र, नेहमीप्रमाणे विलिनीकरणाच्या चर्चेबाबत काहीही स्पष्ट न सांगता सस्पेन्स कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुभंगल्यानंतर शरद पवार व अजित पवार यांच्या नात्यात कडुता आल्याचं दिसून येत होतं.

आणखी वाचा : माजी केंद्रीय मंत्र्याच्या हत्येची ५० वर्षानंतर पुन्हा होणार चौकशी? कोण होते ललित नारायण मिश्रा?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार (पीटीआय फोटो)

विधानसभेनंतर काका-पुतण्याची पाचवी भेट

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, त्यानंतर काका-पुतणे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. मे महिन्यात, अजित पवार व शरद पवार मुंबईतील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. एप्रिलमध्ये ते साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सिल बैठकीत एकाच मंचावर आले. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुडा कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येणार का, अशी चर्चा रंगू लागली.

राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार?

येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन आहे. काँग्रेसपासून विभक्त झाल्यानंतर शरद पवार यांनी १९९९ साली ‘अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस’ची स्थापना केली होती. जुलै २०२३ मध्ये, पक्षफुटीनंतर अजित पवारांनी निवडणूक आयोगात धाव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर दावा केला. परिणामी शरद पवारांना पक्षाचं नाव ‘घड्याळ’ हे चिन्ह दोन्ही गमावावं लागलं. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ हे नवं नाव आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह दिलं आहे.

राष्ट्रवादीतील नेत्यांचे म्हणणं काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी असं जाहीर केलं होत की, राष्ट्रवादीने (शरद पवार गट) विरोधी बाकावर राहायचं की नाही याचा निर्णय पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्यावर सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आजपर्यंत दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत उघडपणे भाष्य केलेले नाही. दरम्यान, काका-पुतण्याशी जवळीक असलेल्या राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “मतदारसंघ टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही पक्षाचे विलिनीकरण करावेच लागणार आहे. लवकर किंवा उशिरा दोन्ही गट एकत्र येणारच… यापुढची कोणतीही फूट दोन्ही पक्षासाठी चांगली नसेल.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील आव्हाने

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी आपला जनाधार मजबूत करणे हे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.
  • राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये नगसेवकपदाच्या एकूण दोन हजार ७३६ जागा आहेत.
  • २०१५ ते २०१८ दरम्यान झालेल्या महापालिका निवडणुकांत भाजपाने त्यापैकी एक हजार ०९९ जागा (म्हणजे ४०.२%) जिंकल्या होत्या.
  • त्यांच्या मतांची एकूण टक्केवारी ३१.३ होती, जी कोणत्याही इतर राजकीय पक्षापेक्षा सर्वाधिक होती.
  • गेल्या महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेना ही दुसऱ्या मोठ्या क्रमांकाची पार्टी होती.
  • शिवसेनेने १८.४९ टक्के मतांसह ४३९ जागा जिंकल्या होत्या.
  • काँग्रेसने ४३९ जागा आणि १५.५३ टक्के मते, तर ‘अविभाजित’ राष्ट्रवादी काँग्रेसने २९४ जागा आणि ११.०६ टक्के मते मिळवली होती.

यावर्षी इचलकरंजी आणि जालना या दोन नव्याने स्थापन झालेल्या महापालिकांमुळे निवडणूक होणाऱ्या महापालिकांची एकूण संख्या २७ वरून २९ वर जाणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजपाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न असेल. भाजपामधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले,
“भाजपाने सध्या गावपातळीवर आपली ताकद मजबूत केली आहे. जर पक्षाने योग्य नियोजन केलं, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आम्ही सर्वात मोठा विजय मिळवू शकतो.”

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची नेमकी स्थिती काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शरद पवार आणि अजित पवार दोघांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा ठरणार आहेत. त्याआधी दोन्ही पक्षाचे विलिनीकरण झाले तर ते फायदेशीर ठरू शकते, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) वरिष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विलिनीकरणाच्या चर्चेला फक्त तर्कवितर्क असे म्हणत फेटाळले आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनीही स्पष्ट सांगितलंय की, दोन्ही बाजूंनी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव समोर आलेला नाही. यादरम्यान, दोन्ही गटांतील मोठ्या वर्गाचं असं म्हणणं आहे की, अजित पवार व शरद पवार हे कधीही एकत्रित येऊ शकतात.

हेही वाचा : Indira Gandhi Death : इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

पक्षाला लागलेली गळती थांबवण्याची धडपड

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवारांवर मात करीत पक्षाचे तब्बल आठ खासदार निवडून आणले होते. दुसरीकडे अजित पवार गटाचा फक्त एकच खासदार निवडून आला होता. त्याच वर्षी सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांत, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला फक्त १० जागाच (११.२८% मतं) जिंकता आल्या. तर अजित पवारांच्या गटाने ४१ जागांवर (९.०१% मतं) विजय मिळविला. ८४ वर्षीय शरद पवार यांच्यासमोर पुन्हा पक्षाला बळकटी देण्याचे आव्हान आहे. जेव्हा पक्ष एकत्रित होता, तेव्हाही शरद पवार यांचा भर मुख्यतः राष्ट्रीय मुद्द्यांवर असायचा.

स्थानिक पातळीवरील राजकारण आणि स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय भूमिका अजित पवार घेत असत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षातील बहुतांश अनुभवी नेते अजित पवारांबरोबर गेले आहेत. सध्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) कमकुवत स्थितीत असताना शरद पवार हे विलिनीकरणाच्या चर्चेचा वापर पक्षाला ऊर्जा देण्यासाठी करत आहेत, असं अनेकांचं म्हणणं आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? असा प्रश्न माध्यमांनी आमदार रोहित पवार यांना विचारला. त्यावर उत्तर देताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे तसाच अनेकांना पडला आहे. मात्र, आजपर्यंत फक्त ही चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवर सर्व आमदारांना घेऊन सुप्रियाताई, शरद पवार, जयंत पाटील यांनी आम्हाला कुठेही काही सांगितले नाही. जर आम्हाला काही कळालं तर आम्ही समोरून नक्की येऊन सांगू. सुप्रिया ताई परदेशातून आल्यावर भूमिका स्पष्ट करतील. शरद पवार साहेबांच्या मनात काय आहे? हे कळत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.