अलिबाग : लोकसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाड्यातून अपयश येत असताना महायुतीला कोकणाने साथ दिली. त्याच पाठिंब्याची आस घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना ठाकरे गटाने कोकणवासीयांना भावनिक साद घालून प्रचारात रंग भरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील १५ मतदारसंघांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कोकण हा शिवसेनेचा कायमच बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली होती. शिवसेनेचे नऊपैकी सहा आमदार फुटून शिंदे गटात सामील झाले होते. पक्षासाठी हा मोठा आघात होता. शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. १५ पैकी ८ मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांना भिडणार आहे.

हेही वाचा : विदर्भ: ‘कटेंगे’ ते सोयाबीनपर्यंत प्रचाराची धार

शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत गद्दारी आणि निष्ठावंत हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांना भावनिक साद देत पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे आव्हान केले. तर शिवसेना शिंदे गटाने विकासाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला. गेल्या अडीच वर्षांत झालेला पायाभूत सुविधांचा विकास, रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील सात पुलांच्या कामांना झालेली सुरुवात, अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्ग, समृद्धीच्या धर्तीवर होऊ घातलेला ग्रीन फिल्ड दृतगती मार्ग, पनवेल परिसरात होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईला कोकणाशी जोडणाऱ्या अटल सेतूचा दाखल देत मतदान करण्याचे आवाहन केले.

लाडकी बहीण, वयश्री योजनांचा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिल्या. शेकापने वाढती बेरोजगारी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, भूसंपादनामुळे निर्माण होणारे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न यावर बोट ठेवतानाच, स्थानिक आमदारावर अकार्यक्षमतेचे आरोप करत लक्ष्य केले. रत्नागिरीत नाणार रिफायनरी आणि मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम यावर ूमविआने आवाज उठवला.

हेही वाचा : मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती

प्रमुख लढती

किरण सामंत वि. राजन साळवी (राजापूर),

दीपक केसरकर वि. राजन तेली (सावंतवाडी),

नीलेश राणे वि. वैभव नाईक (कुडाळ),

भरत गोगावले वि. स्नेहल जगताप (महाड).

एकूण मतदार संघ – १५

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 emotional appeal to voters in konkan print politics news css