राष्ट्रवादीच्या (शरद पवार) प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करून संघटना वाढीसाठी नेतृत्वाने वेगळे पाऊल टाकले असले तरी आगामी पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवून पक्षाची ताकद टिकविण्याचे मोठे आव्हान असेल. विधानसभा निकालाने पक्षात आलेली मरगळ, नेतेमंडळींचे पक्षांतर, सामान्य कार्यकर्त्यांमधील चलबिचल यातून पक्षाची बांधणी करण्याबरोबरच पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवारांच्या नेतृत्वाची कस लागणार आहे.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची राज्याच्या राजकारणावर गेली ४० वर्षांपेक्षा अधिक काळ चांगली पकड आहे. स्वबळावर ६० आमदार निवडून आणण्याची पवारांची क्षमता आहे. काँग्रेस असो वा भाजप राष्ट्रीय पातळीवर पक्ष शरद पवारांच्या राजकारणाचा वेध घेऊनच राज्यात पावले टाकतात. अजित पावरांच्या बंडानंतररही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून पवारांनी त्यांची ताकद दाखवून दिली. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीची पार पिछेहाट झाली. पक्षाचे फक्त १० आमदार निवडून आले. निकालानंतर अनेक नेत्यांनी वेगळी वाट पत्करली. सत्तेची छाया आवश्यक असलेल्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आधार घेतला. पक्षाचे दहा आमदार असले तरी त्यातील पाच जण केव्हाही फुटू शकतात, असे वातावरण अजित पवार गटाकडून निर्माण करण्यात आले. यातून शरद पवार गटात गोंधळ वाढला. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबतच संशयाचे वातावरण निर्माण झाले. या साऱ्यातून बाहेर पडून पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवारांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत.
जयंत पाटील हे गेली सात वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. २०१९ व २०२४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आल्या. अजित पवारांच्या बंडानंतर पक्ष संघटनेचते नुकसान होणार नाही या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले होते. एकत्रित राष्ट्रवादीत अजित पवारांचा जयंत पाटील यांच्याकडे अध्यक्षपद कायम ठेवण्यास आत्रेप होता. बंडानंतर रोहित पवार यांनीच जयंत पाटील यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आगामी निवडणुका लक्षात घेता शरद पवारांनी भाकरी फिरवली. आता नव्या नेतृत्वाकडून चांगल्या यशाच्या अपेक्षा आहेत.
प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करून राष्ट्रवादीने मराठा समाजातील आक्रमक नेत्याकडे सूत्रे सोपविली आहेत. सातारा जिल्ह्यातील शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते आहेत. त्यांच्या मागे माथाडी कामगारांची मोठी फौज आहे. बोलण्यात आक्रमकपणा आहे. कोणाच्याही अंगावर जाण्याची त्यांच्यात धमक आहे. या साऱ्या बाबी शिंदे यांच्यासाठी अनुकूल आहेत. पण सातारा आणि नवी मुंबई बाहेर फारसे संघटनात्मक काम करण्याचा अनुभव नसल्याने शिंदे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्षपद आव्हानात्मक असेल. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी शिंदे यांना जोर लावावा लागेल. पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचा निर्धार शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड होतात जाहीर केला. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवून देण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर असेल.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, परभणी, उल्हासनगर, अमरावती व काही प्रमाणात ठाणे या महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीला सत्ता वा बऱ्यापैकी यश मिळाले. अन्यथा पक्षाची ताकद ही नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्येच अधिक होती. यंदाही शरद पवार गटाला ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शरद पवार गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.