पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे धंगेकर हे एकदम शांत झाले होते. मात्र, महापालिकेच्या प्रभाग रचनेत ‘कसब्या’चे वगळलेले नाव प्रभागाला पुन्हा देण्याशिवाय अन्य कोणताही बदल न झाल्याने भाजपवर नाराज असलेले धंगेकर यांनी पुन्हा राजकीय लढाईला सुरूवात केली आहे. त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदार संघात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीच्या दहशतीवरून पाटील यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजप- शिवसेना शिंदे पक्षात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धंगेकर हे काँग्रेसमध्ये असताना ते कायम भाजपवर टीका करायचे. पोर्शे मोटार अपघात प्रकरण, ससूनमधील अमलीपदार्थ तस्करी प्रकरणानंतर धंगेकर हे नाव सर्वदूर पोहोचले. ‘कसब्या’च्या पोटनिवडणुकीत प्रचाराच्या काळात ‘हू इज धंगेकर?’ हा चंद्रकांत पाटील यांचा प्रश्न चर्चेत राहिला आणि धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत विजय साकारत धंगेकर हे कोण, ते दाखवून दिले. मागील निवडणुकीत धंगेकर यांचा पराभव झाल्यानंतर ते शांत झाले होेते. काँग्रेस सोडून त्यांनी महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांच्याकडे पुणे शहर महानगरप्रमुख पद दिले. त्यानंतर धंगेकर यांनी मूळ स्वभावाला मूरड घालून भाजपवरील राग उघडपणे व्यक्त करणे बंद केले.
महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेत भाजपच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी धंगेकर यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘कसब्या’तील प्रभागांची रचना ही सोयीची करून घेतल्यानंतर धगेकर हे नाराज झाले होते. आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचे चिरंजीव तेजस धंगेकर हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रारुप प्रभाग रचनेत धंगेकर यांचे कार्यक्षेत्र असलेल्या प्रभागाच्या नावातून ‘कसबा’ हे नावाच काढून टाकण्यात आले होते. त्यासाठी धंगेकर यांनी आंदोलन केल्यावर अंतिम प्रभाग रचनेत प्रभागाला हे नाव जोडण्यात आले. मात्र, रचनेत कोणताही बदल झाला नसल्याने धंगेकर हे पुन्हा आक्रमक झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
धंगेकर यांनी आता चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पाटील यांच्या कोथरुड विधानसभा मतदार संघात कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीने दहशत सुरू केल्याचा प्रकार घडल्यानंतर आणि घायवळचा भाऊ सचिन याला शस्त्रपरवाना देण्यावरून धंगेकर हे कोथरुडमधील गुन्हेगारीवरून पाटील यांच्यावर टीका करत आहेत. त्यावरून महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षात संघर्ष पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, धंगेकर हे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत असल्याने त्याची दखल भाजपने घेतली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केली आहे.