Bengaluru RCB Victory parade Stampede: बुधवारी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारला तीव्र विरोध होत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांचे राजकीय सचिव के. गोविंदराजू यांना पदावरून बडतर्फ केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी बडतर्फ झालेले आहेत. या प्रकरणात ते बडतर्फ झालेले पहिले कॅबिनेट दर्जाचे अधिकारी ठरले आहेत.
सरकार आणि पोलिसांतील अनेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू शहर पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. गोविंदराजू हे सध्या विधान परिषद सदस्य आहेत. त्यांनी राज्य विधिमंडळाच्या विधानसभेत विजयी परेड आणि उत्सवाची कल्पना मांडली होती. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी त्यांनी राज्य सरकार, केएससीए (कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना) आणि आरसीबी यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे, असे एका सूत्राने सांगितले. एका विशिष्ट टप्प्यावर केएससीए आणि राज्य सरकारमधील संवादांबद्दल कर्नाटक पोलिसांना अंधारात ठेवण्यात आले होते. दरम्यान, गोविंदराजू यांना केएससीए निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याने मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्याची कल्पना पुढे रेटली होती, असा आरोप काँग्रेसमधील सूत्रांनी केला आहे.
आरसीबीच्या विजयी परेडची कल्पना
- आयपीएलचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा समावेश होतो.
- रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आरसीबीने यंदा पहिल्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं.
- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९० धावांची मजल मारली. आरसीबीचा आधारवड असलेल्या विराट कोहलीने ४३ धावांची खेळी केली. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग आणि कायले जेमिसन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.
- प्रत्युत्तरादाखल खेळताना शशांक सिंगच्या नाबाद ६१ धावांच्या खेळीच्या बळावर पंजाबने १८४ धावांची मजल मारली. आरसीबीने ६ धावांनी थरारक विजय मिळवला. ४ षटकात अवघ्या १७ धावांच्या मोबदल्यात २ विकेट्स पटकावणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
- आरसीबीच्या विजयानंतर म्हणजेच ३ तारखेला रात्री बंगळुरू शहरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. सोशल मीडियावरही आरसीबीच्या चाहत्यांनी संघाचं अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला होता.
राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या एका गटाकडून क्रीडा मंत्री म्हणून ओळखले जाणारे गोंविंदराजू यांना पडद्यामागे काम करणारे समस्या निवारक म्हणून पाहिले जात होते. गेल्या दोन दशकांमध्ये, जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेत आली आहे, तेव्हा त्यांनी कायमच महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गोविंदराजू यांनी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन आशिया, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
दरम्यान, याप्रकरणी गोविंदराजू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शुक्रवारी त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “आरसीबीशी कधीही संबंधित नव्हतो आणि केएससीएने कधीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही. हे सर्व एका किरकोळ मुद्द्यावरून घडले आहे आणि काहीच मोठी गोष्ट नाही, मी पुढच्या आठवड्यात तुमच्याशी बोलेन.”
कोलार इथल्या नोकरशहा कुटुंबातील गोविंदराजू हे सत्तेच्या गल्लीपर्यंत पोहोचू शकलेत असे काही सूत्रांनी सांगितले. त्यांचा मोठा भाऊ राज्य सेवेतून बढती मिळालेला आयएएस अधिकारी आहे. गोविंदराजू यांच्या उत्साही वर्तन आणि कधीही न बोलण्याच्या वृत्तीने त्यांना सत्तेच्या शिखरावर पोहोचण्यास मदत केल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. “ते आधी राज्यमंत्री के जे जॉर्ज आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्या संपर्कात आले. गोविंदराजू यांच्याकडे शक्तिशाली राजकारण्यांच्या गरजा पूर्ण करणारा माणूस म्हणून पाहिले जाते”, असेही एका नेत्याने सांगितले.
१९९९ मध्ये शिवाजीनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पदार्पण करताना गोविंदराजू यांनीही निवडणुकीच्या राजकारणात पाऊल ठेवले होते. मात्र, या निवडणुकीत ते अपयशी ठरले होते. ते राज्याच्या सत्ता वर्तुळाचा भाग म्हणून राहिले आणि २०१२ मध्ये ते विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आले. २०१५ ते २०१८ दरम्यान त्यांनी सिद्धरामय्या यांचे संसदीय सचिव म्हणूनही काम केले.
काँग्रेस वर्तुळात पक्षाचे निधी संकलन करणारे ते एक महत्त्वाचे व्यक्ती होते. गोविंदराजू २०१७ मध्ये आयकर अधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना केलेल्या ६०० कोटी रुपयांच्या देयकांची माहिती असलेली डायरी सापडल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद, सहाय्यक पोलिस आयुक्त सी बालकृष्ण, पोलिस उपायुक्त (मध्य विभाग) शेखर एच टेक्कान्नावर, अतिरिक्त पोलिस आयुक्त विकास कुमार विकास आणि कबन पार्क पोलिस ठाण्याचे सर्कल पोलिस निरीक्षक एके गिरीश यांना गुरुवारी तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे जाहीर केले