सांंगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेल्या शिराळा मतदार संघामध्ये यावेळी चुरशीच्या लढतीचे संकेत असले तरी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना घेरण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सध्या सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार नाईक यांनी गेल्या पाच वर्षात वाकुर्डे योजनेच्या कामाला दिलेली गती आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याशी असलेले मतभेद गाढून नव्या उमेदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, तर विरोधकांकडून भाजपकडून सम्राट महाडिक आणि भाजपचे हातकणगले लोकसभा प्रचार प्रमुख आणि जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या पक्षाकडूनही या मतदार संघावर दावा सांगितला जाण्याची शक्यता असली तरी उमेदवार मात्र अद्याप समोर आलेला नाही. विरोधक म्हणून कोण समोर येणार आणि कोणत्या चिन्हावर समोर येणार याबद्दल कुतूहल आहे.

हे ही वाचा… कारण राजकारण: पालघरच्या ‘सुरक्षित’ जागेसाठी महायुतीत चुरस

वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश असलेला शिराळा विधानसभा मतदार संघ. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे स्व.शिवाजीराव देशमुख यांनी या मतदार संघात काँग्रेस रूजवली. मात्र, त्यांनी उभ्या केलेल्या सहकारी संस्थांना अपेक्षित पाठबळ लाभले नाही. तथापि, तालुक्याचे लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दुसरी फळी राजकारणात सक्रिय राहिली. या चिखलीच्या नाईक कुटुंबातील शिवाजीराव नाईक यांनी एक दशक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना अभ्यासू नेतृत्वाचा वारसा निर्माण केला होता. युती शासनाच्या काळात जिल्ह्यात पाच अपक्ष आमदार निवडून आले, यामध्ये त्यांचा समावेश होता. युती शासनाला पाठिंंबा देण्याच्या बदल्यात त्यांना राज्य मंत्रीमंडळात स्थानही मिळाले. मात्र, यानंतर कधी भाजप, कधी अपक्ष असा खेळखंडोबा झाल्याने त्यांचा गट विखुरला गेला. या अस्थिरतेमध्ये आमदार पाटील यांच्या पाठिंब्यावर चिखलीच्या नाईक घराण्यातील मानसिंगराव नाईक यांना नेतृत्वाची संधी मिळाली.

मागील म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचा पराभव करून मानसिंगराव नाईक निवडून आले. मात्र, या निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या सम्राट महाडिक यांनी घेतलेली ४५ हजार मते या निवडणुकीत निकालाचा कल बदलणारी ठरली. गेल्या पाच वर्षात वारणेच्या पात्रातून बरेच पाणी वाहून गेले. शिवाजीराव नाईक यांनी भाजपचा त्याग करत शरद पवार गटात प्रवेश केल्याने चिखलीच्या नाईक वाड्यातील भाउबंदकी संपुष्टात आली. सध्या दोन्ही नाईक सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र वावरत असतात. वाकुर्डे योजनेला आवश्यक निधी उपलब्ध झाल्याने कामाला गती आली आहे. या योजनेमुळे शिराळा तालुक्यातील ३९ गावांतील ७ हजार २७० हेक्टर आणि वाळवा तालुक्यातील ५७ गावांतील १८ हजार ५६५ हेक्टर तर कराड तालुक्यातील १४ गावांतील २२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याचबरोबर केवळ शिराळकरांचाच नव्हे तर तमाम महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकालाही निधी उपलब्ध झाला आहे. या जोरावर आमदार नाईक पुन्हा एकदा माजी मंत्री नाईक यांना सोबत घेउन मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी रोजगाराच्या निर्माण केलेल्या संधीही जमेच्या बाजू ठरणार आहेत.

हे ही वाचा… प्रजा म्हणते, मुंबईत “मविआ”चेच आमदार अव्वल!

दुसर्‍या बाजूला महाडिक की देशमुख यापैकी कोण याचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत विरोधक संघटित होउन मैदानात उतरत नाहीत तोपर्यंत लढतीचे चित्र सष्ट होणार नाही. महाडिक यांची ताकद पेठ, वाळवा तालुक्यातील गावात असली तरी या गावात आमदार जयंत पाटील यांचीही मोठी ताकद सहकाराच्या माध्यमातून एकवटली आहे. कोकरूड परिसरात देशमुख गटाची ताकद आहे. तर शिराळा तालुक्यात विश्‍वास कारखान्याच्या माध्यमातून नाईक गटाची ताकद आहे. या ताकदीची गोळाबेरीज कोण करेल तो यशस्वी ठरणार आहे.

आमदार नाईक हे अजित पवार गटाकडून लढणार असल्याचा संशयही पेरला जात आहे. राजकारणात संशयाचे भूत पेरले तर मतांचे भरघोस पिक हाती येउ शकते. या जोरावर सध्या संशयाचे धुके निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रय्त्न असला तरी याला आमदार नाईक कसा छेदे देतात यावर पुढचे राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे. मतामध्ये या संशयाचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नसली तरी पक्षाच्या वरिष्ठामध्ये काय शिजत आहे हे कळायला अजून थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The challenge before mla mansing fattesingrao naik in shirala assembly constituency for election 2024 print politics news asj