पिंपरी-चिंचवड: अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये पैसे जमा होतील, असा विश्वास कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत, त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. बच्चू कडू यांच्या आंदोलनाविषयीदेखील त्यांनी मत व्यक्त केले.

दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सतत पाऊस कोसळत आहे. एकाच दिवशी वर्षभराचा पाऊस होत आहे. इतका मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढे ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं; ते आता पूर्ण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईचे पैसे जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांच्या खात्यावर पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये पैसे जमा होतील. शेतकऱ्यांनी धीर धरावा. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे आवाहन कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना केले.

पुढे ते म्हणाले, बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे. मुंबईत त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. बैठकीत नक्कीच तोडगा निघेल. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असतील. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि मदतीबाबत चर्चा नक्की होईल. पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांना या संकटातून उभं करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. ते आम्ही नक्कीच पार पाडू. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.