पुणे : राज्यात गाजत असलेल्या बीड प्रकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात भाष्य केले. ‘महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. निर्घृणपणे झालेली हत्या आहे. यात सरकारने लक्ष घातलेले आहे. तीन यंत्रणा तपास करत आहेत. हव्या तर आणखी यंत्रणा लावाव्यात. या प्रकरणी दोषींना पाठीशी घातले जाणार नाही, कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल. वेगळ्या प्रकारचा संदेश राज्यात दिला जाईल,’ अशी स्पष्टोक्ती पवार यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध विषयांसंदर्भात पवार यांनी गुरुवारी बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीड प्रकरणाबाबत एसआयटी, सीआयडी, न्यायालय अशा तीन यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. जो कोणी दोषी असेल, संबंधित असेल, ते सिद्ध झाल्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच पक्ष वगैरे न पाहता, वरिष्ठ पातळीवरील कोणी व्यक्ती दोषी असल्यास गय करण्याचे कारण नाही, असे मीही मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यामुळे चौकशी चालली आहे. आरोपी सापडायला विलंब लागला. मात्र कोणी कोणाला फोन केले हे सगळे आता समजते. तीन यंत्रणा बारकाईने तपास करत आहेत. अहवालात काही तफावत झाल्यास प्रत्येकाच्याच विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच या प्रकरणी राजकारण आणू देणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>धार्मिक कट्टरता कमी करणे आवश्यक! अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांचे आवाहन

विरोधी पक्षातील, सत्ताधारी पक्षातील काहींनी बोलताना कोणावर अन्याय होऊ नये ही खबरदारी घेतली पाहिजे. आरोप करण्यापेक्षा पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली आहे, असे पवार यांनी धस यांचे नाव न घेता सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar clarification on the beed case pune news amy