पिंपरी : ‘गणेशोत्सवातील डीजे, ध्वनीवर्धक (साउंड) वरील बंधने सरकारने आणली नाहीत. इतरांना त्रास होत असल्यामुळे न्यायालयाने बंधने आणली आहेत. न्यायालयात पाठपुरावा करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविली. त्याचप्रमाणे गणेशोत्सवासह महत्वाच्या सणांवरील बंधने उठविण्यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडली जाईल’, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणेशाेत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांना पवार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यावेळी उपस्थित होते.
‘रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी काही दिवस राखीव असतात. त्यातील काही दिवस गणेशोत्सवासाठी दिले जातील’ असे सांगून पवार म्हणाले, ‘गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाईल. गणेशोत्सव स्पर्धेमुळे चांगले वातावरण निर्माण होत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवातून कार्यकर्ता तयार होतो. जगातील पावणे दोनशे देशात गणेशोत्सव पोहोचला आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चुकीचे काम होऊ नये. सामाजिक सलोखा जपावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा’.
‘रस्ते विकास महामंडळ, पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वर्तुळाकार मार्ग (रिंगरोड)सह मोठी कामे हाती घेतली आहेत. यात जमीन जाणारे शेतकरी नाराज होतील. परंतु, शहराचे शंभर वर्षाचे भवितव्य पाहता कठोर निर्णय घेणे काळाची गरज आहे. कोंडी सोडवण्यासाठी रस्ते रुंदीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. पिंपरी-चिंचवडमधील रस्ते रुंद करणे, उड्डाणपूल करण्यासाठी अनेकजण माझ्यावर नाराज झाले होते. त्यावेळी काम करताना किती अडचणी आल्या हे मला माहिती आहे.आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे घर पाडले होते. त्यामुळे विकास कामे करताना सर्वांना खुश ठेऊ शकत नाही’, असे पवार म्हणाले.
गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रो धावणार
‘गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रो धावेल. पहाटेही लवकर मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल. याबाबत महा मेट्रोचे श्रावण हर्डीकर यांना सूचना दिल्या जातील’, असे आश्वासन पवार यांनी दिले.
कंपन्याची गुंतवणूकीस पुण्याला प्राधान्य
‘जगाच्या पाठीवर पुणे पोहोचले आहे. उद्योजकांना नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावतीचे पर्याय देतो. मात्र, त्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहरच आवडते. कारखाने पुणे जिल्ह्यातच करायचे म्हणतात, नाही तर परराज्यात जातो असे सांगतात. त्यामुळे आमचा नाईलाज होतो. पुण्यातील विमान संरक्षण विभागाचे आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळ होणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले.
राज्यावरील कर्ज वाढत आहे. उत्पानाच्या किती टक्के कर्ज काढले पाहिजे, हे ठरवून दिले आहे. त्या मर्यादेच्या बाहेर कर्ज जाऊ देत नाहीत. त्यामुळे देशात चांगली पत रहाते. आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.