पिंपरी : राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पिंपरी-चिंचवड शहराच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्याविरोधात (डीपी) जनआक्रोश मोर्चा काढल्यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी कोणताही वरिष्ठ अधिकारी न आल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. आयुक्त शेखर सिंह यांचा निषेध करून त्यांच्या वर्तनाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठी पुण्यात होतो, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखडा (डीपी) रद्द करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढला. पिंपरी कॅम्पातील शगुन चौक, पिंपरी उड्डाणपूल, फिनोलेक्स चौकमार्गे मोर्चा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आला. येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे, श्याम लांडे मोर्चात सहभागी झाले होते. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने विकास आराखडा तयार केला आहे. राहत्या घरांवर आरक्षणे टाकली आहेत. हा आराखडा जनतेच्या हिताचा नाही. त्यामुळे आराखडा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

सभेनंतर बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यासाठी गेले. परंतु, आयुक्त त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. अतिरिक्त आयुक्तही नव्हते. निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच आले नाही. त्याच्या निषेधार्थ बनसोडे यांनी अर्धा तास प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान असल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बनसोडे म्हणाले, ‘चुकीच्या पद्धतीने तयार केलेला विकास आराखडा रद्द करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. विधानसभेचे उपाध्यक्ष निवेदन देण्यासाठी आले असताना आयुक्तांनी महापालिकेत उपस्थित राहणे गरजेचे होते. ते थांबले नाहीत. तीनही अतिरिक्त आयुक्त नव्हते. आता आयुक्तांना निवेदन देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे. आयुक्तांच्या वर्तनाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.’

राज्य निवडणूक आयोग, सफाई आयोग पुण्यात होता. त्या बैठकीसाठी गेलो होतो. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची बैठक महापालिकेत होती. त्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त होते.शेखर सिंह,आयुक्त,पिंपरी-चिंचवड महापालिका