पुणे : पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांनी आव्हान निर्माण केले होते. येथे महायुती विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याऐवजी काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली. मात्र, मिसाळ यांनी तब्बल ५० हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील विधानसभा निवडणुकीत मिसाळ आणि कदम यांच्यात लढत झाली होती. यंदा दोघी पुन्हा आमनेसामने होत्या. गेल्या वेळी मिसाळ यांना ९७ हजार १२ तर कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. यावेळी बागुल यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीची मते फुटण्याची शक्यता होती. गेल्या वेळी या मतदारसंघात ४९.०५ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.२६ टक्के मतदान झाले. यंदा मतदानाच्या टक्क्यात सुमारे सहा टक्के वाढ झाली. हा वाढलेला मतटक्काही महत्त्वाचा ठरला.

हेही वाचा…हडपसर मध्ये निकाल बदलणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांची मागणी

पहिल्या फेरीपासून आघाडी

आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून मिसाळ यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत २० व्या फेरीअखेर त्या ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. त्यांना १ लाख १७ हजार ८८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कदम ६७ हजार ३७३ मते मिळाली. काँग्रेस बंडखोर उमेदवार आबा बागुल यांना १० हजार ४४६ मते मिळाली. विशेष म्हणजे, यंदा एकूण तीन अश्विनी कदम मैदानात होत्या. त्यातील पहिल्या अपक्ष अश्विनी अनिल कदम आणि दुसऱ्या अपक्ष अश्विनी नितीन कदम चार आकडी मतसंख्या ही गाठता आली नाही.

हेही वाचा…पिंपरी विधानसभा: अजित पवार मंत्रीपद देतील; विजयानंतर अण्णा बनसोडे यांचा विश्वास

बंडखोरीचा फटका

भाजप आणि माधुरी मिसाळ यांच्यासमोर हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान होते. याच वेळी मागील वेळचा पराभव विजयात परिवर्तित करण्याचे आव्हान अश्विनी कदम यांच्यासमोर होते. या मतदारसंघात सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे वारे होते. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र, महाविकास आघाडीला आबा बागुल यांची बंडखोरी रोखता आली नाही. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे दिसत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election result 2024 bjps madhuri misal wins fourth consecutive term asserting dominance in parvati constituency pune print news stj 05 sud 02