पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहेत. भाजपने शहराचे निवडणूक प्रमुख आमदार जगताप यांना केले आहे. त्यामुळे बंधू, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर महापालिकेत सत्ता आणण्याचे मोठे आव्हान शंकर जगताप यांच्यासमोर असणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड हा एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, भाजपच्या माध्यमातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या साथीने पिंपरी-चिंचवडचा गड भाजपाचा बालेकिल्ला म्हणून प्रस्थापित केला. २०१७ मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली. तीनवरून ७७ नगरसेवक झाले. भाजपचा पहिला महापौर झाला. आमदार शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख, भाजप शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता त्यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. भाजपची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान जगताप यांच्यासमोर असणार आहे. कारण, त्यांच्यासमोर महायुती मधील मित्र पक्ष आणि शहरात ताकद असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान असणार आहे.
‘पक्षाने पिंपरी-चिंचवड शहर कार्यक्षेत्रात निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची व अभिमानाची बाब आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. हा विश्वास सार्थ ठरेल याची मी ग्वाही देतो. या निवडणुकांसाठी सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांचे संघटन, पदाधिकाऱ्यांचा संवाद आणि सर्वांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाचे कार्य व जनकल्याणकारी योजना प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जाणार असल्याचे’ आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
आमदार महेश लांडगे यांच्याकडे मावळची जबाबदारी
भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे पुणे उत्तर जिल्हा (मावळ) निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी दिली. पुणे उत्तरमध्ये पक्षकार्य करण्यासाठी विश्वास दाखवल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून जगभरात भारताचा लौकीक वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात्वावर आणि भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमूख कामांवच्या जोरावर आणि भाजपा समर्थक-कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही विजयश्री निश्चितपणे खेचून आणू, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
