पुणे : ‘पुणे पोलीस दलात लवकरच एक हजार पोलीस कर्मचारी दाखल होणार आहेत. शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे,’ अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी भागात आनंदनगर पोलीस चौकीची इमारत बांधण्यात आली आहे. नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे आदी या वेळी उपस्थित होते.

‘शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्र पाेलीस दलात २० हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. त्यापैकी एक हजार पोलीस कर्मचारी पुणे पोलीस दलाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत’, असे पाटील यांनी नमूद केले.

‘पूर्वी राजाराम पुलापर्यंत पुणे शहर पोलिसांची हद्द होती. सिंहगड रस्ता भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जावे लागायचे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची सूचना विचारात घेऊन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या भागाचा समावेश पुणे शहर पोलीस दलात करण्यात आला. आरक्षित जागेवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. नवीन इमारतीत सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे,’ असे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी

पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. गृहविभागाने सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पोलीस दलात मनुष्यबळ वाढवून देण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.