पुणे : ‘कागदपत्रांत काही खाडाखोड केली असेल असे कोणतेही प्रमाणपत्र महसूल विभाग देणार नाही. ओबीसी उपसमितीसमोर छगन भुजबळ यांनी खाडाखोड केलेली कागदपत्रे आणली होती. मराठा कुणबी, कुणबी मराठा असलेल्यांना राज्य मागास आयोगाने ओबीसी दर्जा दिला आहे. त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. मात्र, चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल. खोटे प्रमाणपत्र कुठलाही प्रांत, तहसीलदार देणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली आहे,’ असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

स्वच्छ सुंदर विकसित कसबा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५०० विद्यार्थ्यांच्या सामूहिक शपथेचा कार्यक्रम झाला. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, डीईएस नियामक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, आमदार विक्रम पाटील या वेळी उपस्थित होते. मुरलीधर लोहिया मातृमंदिरच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, ओबीसी समाजावर, अठरापगड जातीवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनाने, मुख्यमंत्र्यांनी हमी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी, मराठा, तसेच सर्व समाजासाठी न्याय्य भूमिकेत आहेत. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय, महाज्योतीसारखी संस्थेची निर्मिती अशी अनेक कामे केली आहेत. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जे काम ओबीसी समाजासाठी केलेले नाही, तेवढे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या काळात ओबीसींचे गेलेले आरक्षणही देवेंद्र फडणवीस यांनी परत आणले. मराठा समाजालाही आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.

समाजकंटकांना माफी नाही

मुंबईत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेवर बावनकुळे म्हणाले, दुष्कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना माफी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजकंटकांना शोधून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या समाजकंटकाला सोडणार नाही.

‘पवारांनी बोलू नये…’

जातींच्या उपसमिती स्थापन करण्याबाबत शरद पवार यांनी सरकारवर केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘उपसमिती करून योजना तयार केल्या जातात. त्यात वाईट काही नाही. ज्यांनी कधी महाराष्ट्राच्या भल्याचा विचार केला नाही, सामाजिक समता आणण्याचा विचार केला नाही, त्या शरद पवार यांनी अशा गोष्टी बोलू नयेत,’ असे त्यांनी नमूद केले.

‘संशोधन अधिछात्रवृत्तीबाबत लवकरच निर्णय’

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या पीएचडीच्या अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी उमेदवार पुण्यात आंदोलन करत आहेत. त्याबाबत बावनकुळे म्हणाले, ‘याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. लवकरच निर्णय होईल.’