पुणे : तळेगाव दाभाडे-उरूळी कांचन या प्रस्तावित बाह्यवळण रेल्वे मार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्ग बदलता येणे शक्य आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सात नोव्हेंबर रोजी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
तळेगाव दाभाडे ते उरूळी कांचन या रेल्वे मार्गासंदर्भात दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे मार्गाची आखणी करण्यात आली आहे. अनेक गावातून जाणाऱ्या या प्रस्तावित रेल्वे मार्गाला खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्याविरोधात सातत्याने आंदोलनेही होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, भूसंपादन समन्वयक डाॅ. कल्याण पांढरे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका कायम ठेवली. दरम्यान, ‘मार्ग बदलण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतील जाईल,’ असे आश्वासन जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.
‘प्रकल्पग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांपैकी दहा जणांची समिती स्थापन करावी आणि या समितीच्या माध्यमातून रेल्वे प्रकल्बाबत मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल,’ असे डुडी यांनी स्पष्ट केले.
‘रेल्वे मार्ग जात असलेल्या गावातील नागरिकांची संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी. राज्य औद्योगिक विकास महामंडळ, रिंग रोड तसेच अन्य प्रकल्पासाठी या भागातील जमिनी संपादित झाल्या आहेत. ही बाब पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पवार यांच्या सूचनेनुसार ही बैठक झाली. प्रकल्पामुळे कोणाचे नुकसान होणार नाही, हे पाहिले पाहिजे,’ असे आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले.
दिलीप मोहिते-पाटील म्हणाले, ‘खेड तालुक्याती विविध प्रकारचे सहा ते सात प्रकल्पांची उभारणी प्रस्तावित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमिनी दिल्या आहेत. तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडचा थेट फायदा होणारन ाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लाॅजिस्टिक पार्कसाठी अदानी, अंबांनी यांच्या कंपन्यांना जमिनी देण्यात आल्या आहेत. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला हा रेल्वे मार्ग जोडला जावा, अशी मागणी आहे. प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.’
तळेगाव दाभाडे-उरूळी कांचन रेल्वे मार्गाबाबत काही नवा पर्याय सुचविता येईल का, याचा विचार केला जाईल. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी बैठक होणार आहे. त्या बैठकीत चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
