पुणे : विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार दत्ता बहिरट यांनी भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायलयाने फेटाळली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे याबाबतचा निकाल दिला.
विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप दत्ता बहिरट यांनी याचिकेद्वारे केला हाेता. मतदारयादीत छेडछाड, मतदारसंख्येत झालेली वाढ याबाबत बहिरट यांनी याचिका दाखल केली होती. माझा पराभव मोठ्या मताधिक्क्याने झाला असून, हे अशक्य असल्याचे बहिरट यांनी याचिकेत म्हटले होते. उच्च न्यायालयात दाखल याचिकेत निवडणूक आयोगासह अन्य यंत्रणांना पक्षकार करण्यात आले होते. या प्रकरणात शिरोळे यांच्यावतीने ॲड. अनुराग मिश्रा आणि ॲड. रोहन नहार यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. बहिरट यांची याचिका फेटाळून लावण्यात यावी, असा अर्ज त्यांनी केला होता.
‘बहिरट यांनी निवडणुकीबाबत दाखल केलेल्या याचिकेत तपशील नाहीत. बेजबाबदारपणे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत अस्पष्ट आरोप करण्यात आले आहेत. याचिकेत दाखल केलेल्या मुद्द्यांमध्ये निवडणूक रद्द का करावी, याबाबतची कारणे देण्यात आलेली नाहीत. अशा प्रकारची याचिका सुरुवातीलाच फेटाळण्यास पात्र आहे’, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
