जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथे खंडोबा देवाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागांतून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र, जेजुरी रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वे गाड्या थांबत नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या स्थानकावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची मागणी भाविक आणि ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी २० जुलै रोजी रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा इशारा जेजुरी रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.
जेजुरीपासून दोन किलो मीटर अंतरावर ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने या रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम झाले आहे. येथून २५ गाड्या दररोज ये-जा करत असतात. त्यापैकी फक्त आठ गाड्या जेजुरी स्थानकावर थांबतात. लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.
या स्थानकावरून कोल्हापूर निजामुद्दीन एक्सप्रेस ,कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, अजमेर बेंगलोर एक्सप्रेस ,लोकमान्य हुबळी एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, पांडेचरी एक्सप्रेस, चंदिगड यशवंतपुर एक्सप्रेस, दादर म्हैसूर एक्सप्रेस ,जोधपूर मेंगलोर एक्सप्रेस या गाड्या जातात. मात्र, या गाड्यांचा जेजुरीत थांबा नाही. गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस सातारा पुणे डेमू. कोल्हापूर पुणे डेमू, पुणे कोल्हापूर डेमु, मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस या फक्त आठच गाड्या जेजुरी येथे थांबतात.
गेल्या अनेक वर्षांपासून जेजुरीत सर्व गाड्या थांबण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या मागणीसाठी २० जुलै रोजी जेजुरी रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे जेजुरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे, उपाध्यक्ष अमोल शेवाळे यांनी सांगितले.
जेजुरी रेल्वे स्थानकावरून पूर्वी रेल्वेने मुंबईला झेंडूची फुले आणि शेतमाल पाठविण्यात येत होता. मात्र, आता गाड्यांच्या वेळा शेतकऱ्यांच्यादृष्टीने गैरसोयीच्या असल्याने हा माल पाठवणे बंद झाले आहे. जेजुरीच्या खंडोबाचे भक्त कर्नाटक ,आंध्र ,तामिळनाडू ,दिल्ली आदी भागांतून जेजुरीला दर्शनासाठी येतात. या भक्तांना जेजुरीत येण्यासाठी थांबा नसल्याने पुण्यात उतरावे लागत असल्याचे खोमणे आणि शेवाळे यांनी स्पष्ट केले.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. येथे सर्व गाड्या थांबल्यास औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी, उद्योजक यांना उपयोग होऊ शकेल, असे जेजुरी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनी सांगितले.