बारामती : बारामती आणि इंदापूर तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने ओढेड, नाले तुडुंब भरले असून शेती पाण्याखाली गेली आहे. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसात सुरुवात झाली. रात्रभर या दोन्ही तालुक्यांमध्ये कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पावसाची तडाखे बसत राहिले.
परिणामी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पूल पाण्याखाली गेला असून, काझड येथे पावसाच्या पाण्याने जोड कालवा फुटल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. हवामान विभागाने आज देखील मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ओढ्यांना पूर आले आहेत. बारामतीसह इंदापूर तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने बारामती- इंदापूर रस्त्यावरील सणसर येथील ओढ्याला पूर आला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओढ्याचे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.