पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची बैठक शनिवारी पुण्यात होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सुपर वाॅरिअर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट एकत्रित लढविणार आहेत. लोकसभेसाठी महायुतीने राज्यातून ४५ जागांचे लक्ष्य ठेवले असून, त्या दृष्टीने ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी. एल. संतोष, सहसंघटक मंत्री शिव प्रकाश यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेसह २०२४ ची निवडणूक शुभ! ‘रामराज्य’ येण्याचा मुख्य पुजाऱ्यांना विश्वास
पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुपर वाॅरिअर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. तसेच प्रदेश महिला मोर्चा बैठकही ते घेणार आहेत. बिबवेवाडी येथे राजस्थानी समाजाचा मेळावा आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बावनकुळे चर्चा करणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.