पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पैशांचे वाटप झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणी पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली आहे.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती मतदारसंघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला आमराई, मुजावर वाडा येथे पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच दमदाटी व दादागिरी केली जात आहे. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर या भागात पोलीस बंदोबस्त वाढवून, गस्त घालावी आणि समाजकंटकांवर कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : मोहोळ, धंगेकर यांना दुसरी नोटीस; प्रचार खर्चातील तफावत वाढली

दरम्यान, मंगळवारी सकाळी बारामती येथे आमदार रोहित पवार हे मतदान करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, “मतदानाच्या अगोदरच्या दिवशी सर्व ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. भोरमध्ये जी गाडी फोडली त्यात पैसे सापडले. बारामतीत कधीही पैसे वाटले गेले नाहीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वाटप करण्यात आले, खर तर ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनाधक्ती अशीच म्हणावी लागेल. पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी पैसे नाकारले. सर्व सामान्य नागरिकांसाठी पुणे जिल्हा बँक ही ५ वाजता बंद होते. मात्र यांच्यासाठी रात्री एक एक वाजेपर्यंत सुरू राहते. तसेच कर्मचारी देखील यात सहभाग घेतात. हे खूप वाईट आहे. त्यामुळे यंदाची बारामतीची लढाई ही जनशक्ती विरूद्ध धनशक्ती  अशीच होणार आहे.

हेही वाचा : पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी

राज्य सरकारने ज्यांना कुणाला वाय प्लस सुरक्षा दिली आहे. ती यासाठीच दिली आहे. भोरमध्ये हे पैशांचे वाटप झाले ते मावळचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते होते. तसेच जे साखर कारखाने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्या कारखान्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच ही निवडणूक आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In baramati lok sabha election rohit pawar allegations of money distributed for votes pune print news psg 17 css