पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार खर्चाचा ताळेबंद उमेदवारांच्या खर्च तपासणीच्या दुसऱ्या तपासणीत जुळत नसल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दुसरी नोटीस सोमवारी पाठविली. मोहोळ, धंगेकर यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारांनाही नोटीस पाठविण्यात आली.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांनी केलेल्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी सोमवारी पार पडली. धंगेकर यांनी पहिल्या टप्प्यात सादर केलेल्या २७ लाख ५९ हजार ६७७ रुपयाचा खर्च सादर केला. त्यामध्ये नऊ लाख पाच हजार १८ रुपयांची तफावत आली होती. महायुतीचे मोहोळ यांनी ३३ लाख १३ हजार ४०२ रुपयांचा खर्च सादर केला होता, त्यामध्ये २७ लाख २४ हजार २३२ रुपयांची तफावत आली होती. त्यामुळे धंगेकर, मोहोळ यांना पहिली नोटीस पाठविण्यात आली होती. या दोन्ही उमेदवारांना ६ मेपर्यंत तफावत काढण्यात आलेल्या खर्चाचा खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
हेही वाचा >>> पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील प्रचार खर्च तपासणीत धंगेकर यांचा आतापर्यंत ३८ लाख ८९ हजार ३९२ रुपये प्रचार खर्च झाला आहे. मात्र धंगेकर यांच्या प्रचार खर्चात ११ लाख ६७ हजार ७०९ रुपयांच्या खर्चाची तफावत आली आहे. मोहोळ यांचा आतापर्यंत ४९ लाख ३४ हजार ५८ रुपयांचा खर्च झाला आहे. त्यांच्या खर्चात ३६ लाख २७ हजार ५८४ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मोहोळ, धंगेकर यांना तातडीने हिशेब सादर करावा, अशी दुसरी नोटीस पाठविली आहे. अपक्ष उमेदवार सचिन धनकुडे यांनी निवडणूक प्रचार खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते अद्याप उघडले नसल्याने आणि अपक्ष उमेदवार सचिन चोरमले हे पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवार खर्च तपासणीला अनुपस्थित राहिले. परिणामी धनकुडे, चोरमले यांना प्रचार खर्च सादर करण्याबाबत डॉ दिवसे यांनी नोटीस काढली.