पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील चिखलमय रस्ते अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. यामुळे आयटी पार्क परिसरात सातत्याने अपघात घडून अनेक जणांचा जीवही गेला आहे. या परिसरात अनेक मोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्याचा राडारोडा रस्त्यांवर पसरत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याने शासकीय यंत्रणांनी गोदरेज प्रॉपर्टीज, व्हीटीपी रिॲलिटी आणि गेरा डेव्हलपर्स यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

आयटी पार्कच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामाच्या ठिकाणी बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या मालमोटारी सातत्याने रस्त्यांवरून जात असतात. या वाहनांतून पडणारा राडारोडा आणि त्यांच्या चाकांना लागलेला चिखल यामुळे रस्तेही चिखलमय होत आहेत. यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात सिमेंट मिक्सरने चिरडल्याने एका लहान मुलीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांसह संतप्त नागरिकांनी कारवाईची मागणी केली होती.

गेल्या काही दिवसांत चिखलमय रस्त्यांवर दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांसह आयटी कर्मचारी सातत्याने शासकीय यंत्रणांकडे तक्रारी करीत आहेत. अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गोदरेज प्रापर्टीज आणि गेरा डेव्हलपमेंट्स या विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. याचबरोबर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) पत्र लिहून व्हीटीपी रिॲलिटीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पत्र पाठवून या विकासकांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या प्रकरणी गोदरेज प्रॉपर्टीजशी संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही.

विकासकांच्या नोटिशीत काय?

  • बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांवर राडारोडा पसरतो.
  • रस्ते चिखलमय आणि निसरडे होऊन वारंवार वाहनांचे अपघात होतात.
  • वाहनांची चाके धुण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी सुविधा तयार करा.
  • रस्त्यावर राडारोडा पसरणार नाही, याची काळजी घ्या.
  • दररोज सायंकाळी रस्ते स्वच्छ करण्याची जबाबदारी विकासकांनी घ्यावी.

खासदार सुळे यांनीही वेधले लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत म्हटले आहे की, हिंजवडी टप्पा-३ येथील मेगापोलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची चिखलामुळे अतिशय दुरवस्था झाली आहे. याठिकाणी रस्त्याच्या परिस्थितीमुळे आता व यापूर्वीही छोटे-मोठे असे अनेक अपघात घडले आहेत. येथील नागरिकांनी पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, तरीही हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. या रस्त्यांवरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी.

हिंजवडीतील आयटी पार्कमधील रस्त्यांवर विकासकांच्या वाहनांमुळे राडारोडा पसरत आहे. यामुळे अनेक वेळा आमचे कर्मचारी टँकरच्या मदतीने पाण्याने हा रस्ता धुवून घेतात. हा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय असल्याने विकासकांना या प्रकरणी योग्य उपाययोजना करण्यासाठी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. – राजेंद्र तोतला, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

मेगापोलीस भागात अनेक विकासकांच्या गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरू आहे. आम्ही सर्व नियमांचे पालन करीत आहोत. याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनाही पाळत आहोत. प्रकल्पाच्या ठिकाणी वाहनांची चाके धुणे आणि रस्त्यांची स्वच्छता आदी उपाययोजना केल्या जात आहेत. – गेरा डेव्हलपमेंट्स

बांधकाम करताना सर्व नियमांचे पालन करण्यावर आमचा भर असतो. आमचे कर्मचारी दैनंदिन पातळीवर सर्व नियमांची पूर्तता करतात. ही सातत्याने सुरू असणारी आमची प्रक्रिया आहे. आम्हाला अद्याप शासकीय यंत्रणांकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यानंतर त्यातील निर्देशांचे पालन करण्यात येईल. – व्हीटीपी रिॲलिटी

आयटी पार्कमधील रस्त्यांवर काही विकासकांमुळे राडारोडा पसरत असल्याचे पत्र एमआयडीसीकडून मिळाले आहे. आमचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. विकासकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. – बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ