पुणे : शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची दखल कुलगुरूसुरेश गोसावी यांनी घेतली आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आज मोर्चा काढला आहे. जर येत्या आठ दिवसांत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला. शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शर्मिला ठाकरे, मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रवक्ते गजानन काळे, मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यासह विद्यार्थी आणि मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. तर विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू सुरेश गोसावी यांना अमित ठाकरे यांनी दिले.त्यावेळी त्यांची जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद देखील साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे : पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या

यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, सावित्री बाई पुणे विद्यापीठाची स्थापना १९५० मध्ये झाली.जवळपास ७५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तेव्हापासून आजअखेरपर्यंत आपण मेसमध्ये चांगल्या प्रकारचे जेवण मिळत नाही, त्यावर भांडत आहोत आणि त्यामध्ये विद्यापीठ प्रशासन सुधारणा करीत नाही. याबाबत खंत वाटते. तसेच जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. तर त्यांना राहण्याची व्यवस्था पुरेशा प्रमाणात नाही. त्याकरिता वसतिगृहाची संख्या वाढविण्यात यावी, यासह अनेक मागण्या केल्या आहेत. त्यावर कुलगुरू यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा कुलगुरू आणि एकंदरीत प्रशासनाकडून ठेवली आहे. राज्यात आणि पुणे शहरात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे आम्ही आजचा मोर्चा शांततेत काढला आहे. तसेच मी राजकीय जीवनात आल्यापासून माझ्या राजकीय पहिल्या केसची वाट बघतोय आणि ती केस पुण्यामधून मिळाल्यावर आनंदच होईल. आम्ही त्यांना आठ दिवसांची मुदत दिली आहे. जर त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, अशी भूमिका मांडत विद्यापीठ प्रशासनाला त्यांनी इशारा दिला.

हेही वाचा : पुण्यात रविवारी ४०० ठिकाणी होणार ई-कचरा गोळा; संगीतकार डाॅ. सलील कुलकर्णी यांनी केले पुणेकरांना ‘हे’ आवाहन

तसेच अमित ठाकरे पुढे म्हणाले की, पुणे शहरात ड्रग्सचे प्रमाण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. तर पुणे पोलिसांनी जवळपास ४ हजार कोटींच्या रकमेचे ड्रग्स जप्त केले आहेत. याहीपेक्षा अधिक रक्कमेच ड्रग्स असू शकते. त्यामुळे या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची गरज असून गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune mns student wing president amit thackeray s warning to savitribai phule pune university administration svk 88 css