पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना येण्याचं टाळल्याचं बर्याच वेळा पाहण्यास मिळाले आहे. जर कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही नेते एकत्र आलेच तर अगदी मोजकाच संवाद झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे. पण, आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे आणि शरद पवार गटाचे नेते, जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील, शरद पवार गटाच्या नेत्या स्वाती चिटणीस यांसह अनेक नेत्यांचा पक्ष प्रवेश झाला.
त्यावेळी अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज ज्या मंडळींचा प्रवेश झाला आहे, त्या सर्वांनी यापुढील काळात एकत्रित काम करायचं आहे. आपल्या प्रत्येकाला एकमेकांचे स्वभाव, काम करण्याची पद्धत आणि मतदेखील माहिती आहे. पण, अजित पवाराला भेटावं की नाही, त्याचा मूड आहे की नाही हे जालिंदर भाऊला चांगलेच माहिती आहे. पण, तुम्हाला एक कळतंय का? मागचा अजित पवार आणि आताच्या अजित पवारमध्ये खूप फरक पडला आहे. जसं वय वाढतं, तसं आपल्याला बदलावं लागतं, तशी मॅच्युरिटी येते, आपण पूर्वी काही केलं तर आपल्यावर पांघरूण घालायला साहेब असायचे, पण आता आपल्यालाच पांघरूण घालायचं आहे, असे अजित पवार म्हणताच एकच हशा पिकला.
अजित पवार कार्यकर्त्याला म्हणाले, चुलता पुतण्याचं तू मला नको सांगू
भाजपाचे नेते जालिंदर कामठे यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर अजित पवार भाषण करतेवेळी व्यासपीठाकडे पाहात म्हणाले, राकेश कामठे कुठं आहे? तू काही मनाला लावून घेऊ नकोस, कामठे कामठे भावकी एकत्र आलेली आहे. त्याच वेळी खालून एक कार्यकर्ता म्हणाला, चुलत्या पुतण्याचं नातं आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, चुलता पुतण्याचं तू मला नको सांगू, मागच्या पिढीचं नको सांगू आणि आताच्याही पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचंदेखील नको सांगू, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
माझी भावकीच मला सोडून गेली : अजित पवार
विधानसभा निवडणुकीदरम्यान शिरुरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली. तो बिचारा पालकमंत्रिपदाची स्वप्न बघत होता. आता सगळे दादा सोबत गेले. आपण इकडे राहिलो आणि आपलंच सरकार येणार, आपण पालकमंत्री होणार, मग सगळीकडे काम करणार, असे सांगत अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येकाचं स्वप्न आणि ध्येय असलं पाहिजे, त्याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. त्यानंतर मी त्याला सांगितल की, तू मला सोडून गेला आहेस, मी तुला पाडणार, तू कसा निवडून येतो हे मी पाहीन आणि मी आपल्या उमेदवाराला निवडून आणला, असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला; तर शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांना त्यांनी टोला लगावला.