पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटिनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी चिंचवडच्या जागेसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. तर कसबा विधानसभा मतदारसंघासाठी मात्र हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. यावरून पुण्यातील ब्राह्मण समाज नाराज असल्याचे दिसत आहे. जो न्याय चिंचवडच्या जागेसाठी तोच न्याय कसबासाठी का नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण, कसबा पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र ऐनवेळी त्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली. याशिवाय याच मुद्दय्यावरून पुणे शहरात काही फलकही लागले आहेत, या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी एक सूचक विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हा (ब्राह्मण) समाज आजपर्यंत भारतीय जनता पाठीशी खूप खंबीरपणे उभा राहिला आहे. तरीदेखील आठ पैकी एकाही ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली नाही. हे खरंच आश्चर्यजनक आहे. आता त्यामागचं कारण काय, त्यांना गृहीत धरलं जातं का? याचे निश्चितपणे परिणाम दिसणार.” असं रोहित टिळक म्हणाले आहेत.

हेही वाचा – पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकराना उमेदवारी जाहीर

याशिवाय, “मी कधीही विशिष्ट समाज म्हणून कधी आवाहन केलेलं नाही, कारण तशा प्रकारची भूमिका ठेवली नव्हती. सर्व समाज हा एक असतो आणि आम्ही एकत्रच आजपर्यंत राहत आलो आहोत.” असंही रोहित टिळक यांनी यावेळी सांगितलं.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना ‘कसब्या’ तून संधी दिली जाईल, अशी चर्चा असतानाच भाजप नेतृत्वाने शैलेश टिळक यांनाच उमेदवारी नाकारली. यापूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचीही पक्षाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी उमेदवारी नाकारली होती. या दोन्ही घटनांवरून भाजपला ब्राह्मण उमेदवार नको असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जो न्याय ‘चिंचवड’ मतदारसंघाला दिला तो न्याय ‘कसब्या’साठी का नाही, अशी विचारणाही आता ब्राह्मण समाजाकडून होत आहे.

हेही वाचा – “देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे…” ठाकरे गटाचे प्रत्युत्तर!

चार दशकांनंतर ब्राह्मणेतर उमेदवार देण्याच्या भाजपच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून ब्राह्मण संघटनांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba assembly by election congress leader rohit tilak suggestive statement on bjp rejection of brahmin candidate svk 88 msr