राज्यात नुकतीच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी पार पडल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, तर भाजपाने कोकणातील जागा जिंकली. निवडणूक निकालानंतर राजकीय टोलेबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग येथील आंगणेवाडीतील सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत कोकणासाठी काहीच केले नाही. विकास प्रकल्प येऊ दिले नाही,म्हणून येथील तरुणांचे नुकसान झाले. आई भराडीमातेने आम्हाला कौल दिला आहे, तिच्या दर्शनासाठी आलोय. असं फडणवीस म्हणाले होते. यास आता शिवसेना(ठाकरे गट) प्रत्युत्तर दिले आहे.

“नाणारचा प्रकल्प करू नका असा भराडी देवीचाच कौल आहे व तो कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल. इतके ते जागरूक देवस्थान आहे. अदाणींच्या घोटाळय़ामुळे देशाचे, बँकांचे, एलआयसीचे अजिबात नुकसान झाले नाही अशी ऐतिहासिक थाप ज्या पद्धतीने अर्थमंत्री निर्मलाताईंनी मारली, त्याच बेमालूम पद्धतीने फडणवीस यांनी भराडी देवीच्या साक्षीने नाणार रिफायनरीबाबत थाप मारली! कोकणात पाप व ढोंग चालत नाहीत. ही कोकणची परंपरा नाही. श्री देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेडय़ांप्रमाणे बळी जाईल!” अशा शब्दांमध्ये शिवसेनेकडून (ठाकरे गट) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला सामानाच्या अग्रेलखाद्वारे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

याचबरोबर “उपमुख्यमंत्री फडणवीस हे आंगणेवाडीच्या श्री भराडी मातेच्या दर्शनासाठी गेले ते बरेच झाले. भराडी मातेचा इतिहास असे सांगतो की, जे पापी मनाने दर्शनास गेले त्यांना ती चांगलीच अद्दल घडवते व जे सत्कार्य करून गेले त्यांना आशीर्वाद देते. येथे जादूटोणा, जंतर मंतर वगैरे चालत नाही. त्यामुळे फडणवीस तेथे गेले. माता त्यांना सुबुद्धी देईल. याआधी अनेक नेत्यांनी भराडी देवीकडे राजकीय शक्तिप्रदर्शन करून सत्ता व पैशांची मस्ती दाखविण्याचा प्रयत्न केला. त्या सगळय़ांचा कोकणात पराभव झाला. भराडी देवीच्या दरबारात गद्दार वृत्तीच्या ढोंगी भाविकांना अजिबात मान व स्थान नाही हे समजून घेतले पाहिजे. या वेळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे राजकीय भालदार, चोपदार असे असंख्य लोक देवीस गेले. तेथे राजकीय सभा घेतल्या. फडणवीस यांनी देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या मेंदूवरील विद्वेषाची जळमटे दूर होतील असे वाटले होते, पण तसे झाले नाही. हे चांगले संकेत नाहीत व भविष्यात देवी त्यांना धडा शिकवणार असा हा कौल आहे. जाहीर सभेत फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच शिवसेना व ‘ठाकऱ्यां’वर टीका केली. कोकणात रिफायनरी आणणारच असे त्यांनी गर्जून सांगितले. फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते?” असा सवाल विचारण्यात आला आहे.

याशिवाय, “आंगणेवाडीतील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले, ‘‘नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांची दिशाभूल केली गेली. हा प्रकल्प आणला तर आंबे येणार नाहीत असे खोटे सांगितले गेले. मच्छीमारांना सांगितलं गेलं की, मच्छीमारी होणार नाही. रिफायनरीविरुद्ध खोटा प्रचार करून कोकणचे नुकसान केले. आता आम्ही कोकणात रिफायनरी आणणारच!’’ फडणवीस यांनी असा पहेलवानकी षड्डू आंगणेवाडीच्या जत्रेत ठोकला, पण कोकणातील जत्रेत कुस्त्यांचे फड होत नाहीत व कोणी बाहेरच्या पहेलवानाने उगाच येऊन पिचक्या मांडीवर थाप ठोकली तरी कोकणची जनता त्यास धूप घालत नाही. फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व २०२४ सालाआधीच त्यांचे ‘रेडे’ सरकार कोसळणार याची खात्री पटल्याने ते थयथयाट करीत आहेत.” अशा शब्दांमध्ये फडणवीसांवर टीकस्र सोडले गेले आहे.

“रिफायनरी हवी की नको हे जनता ठरवेल. जनतेच्या फळबागा, शेती, मासेमारी कायमची संपवून कोणी विकासाची भाषा करणार असेल तर तो कोकणी जनतेला संपवण्याचा डाव आहे. कोकणात वायुप्रदूषण व जलप्रदूषण वाढवणारेच प्रकल्प का आणता? अशा प्रकल्पांमुळे तारापूरसारख्या भागात काय हाहाकार माजला आहे ते पहा. कर्करोगाचे प्रमाण तेथे वाढले आहे की नाही हे भराडी मातेची शपथ घेऊन सांगा. सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत की नाही, हे जरा सत्य बोला. पहिले म्हणजे नाणार रिफायनरी कोकणात आणण्यापेक्षा गुजरातने महाराष्ट्रातून पळवून नेलेला वेदांत फॉक्सकॉन, एअरबस, ड्रग्स पार्कसारखे प्रकल्प पुन्हा खेचून घेऊन या व त्यातला एखादा मोठा प्रकल्प नाणारात उभा करा. तसे करणार असाल तर तुम्ही खरे, नाहीतर थापा मारत आहात.” असंही ठाकरे गटाकडून म्हटलं गेलं आङे.