पिंपरी-चिंचवड: बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगा ठार झाल्यानंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. संतप्त नागरिकांनी मंचर येथे पुणे- नाशिक महामार्गावर सुरू केलेल्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावर आंदोलकर्ते झोपलेले आहेत. पुणे- नाशिक महामार्ग ठप्प झाला आहे. वाहनांच्या १० ते १५ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. लहान मुले, वृद्ध नागरिक अडकून पडले आहेत.
प्रवाशांना पर्यायी मार्ग देखील नसल्याने रास्ता रोको संपण्याची वाट बघावी लागत आहे. जोपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री घटनास्थळी भेट देत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाहीत, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
शिरूरमधील पिंपरखेड येथे बिबट्याचा हल्ल्यात १३ वर्षीय रोहन विलास बोंबे चा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. मंचर येथे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले असून बारा तासानंतर ही सुरू आहे. यामुळे पुणे- नाशिक महामार्ग ठप्प झाला आहे. पुण्याकडून नाशिक च्या दिशेने आणि नाशिकहून पुण्याच्या दिशेने किमान १० ते १५ किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे. १२ तासांपासून हजारो प्रवाशी अडकून पडले आहेत. प्रवाशांच्या अक्षरशः हाल झाले आहेत. याची दखल सरकारकडून घेणे गरजेचे आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन अधिक उग्र रूप घेण्याची शक्यता आहे.
