पुणे : कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पंचगंगा नदीचे पाणी राधानगरी धरणातून दुधगंगेत नेण्याचे नियोजित आहे. त्यासाठी बोगदा करावा लागणार असून एक हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्त त्यासाठी अपेक्षित आहे. तर पुराचे ६५ अब्ज घनफूट पाणी बोगद्याद्वारे भीमा नदीत आणण्याचा प्रस्ताव खर्चिक असून त्यासाठी केंद्र सरकारसह, विविध बँकांकडून निधी प्राप्त करण्याचे विचारधीन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ‘कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प पुढे नेण्यासाठी सर्वेक्षण सुरु आहे. कोकणात जाणारे पाणी वळविण्याच्याही हालचाली चालू आहेत. विशेषतः उल्हास खोऱ्याचे ६५ अब्ज घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात येऊ शकते. त्याचा अंतिम सर्वेक्षण अहवाल येत्या जानेवारीपर्यंत प्राप्त होणार आहे. कृष्णा खोरे द्वितीय लवाद निवाड्यानुसार राज्याच्या वाट्याला आलेले पाणी प्रत्यक्ष वापरण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचे सादरीकरण येत्या पंधरवड्यात होणार आहे.’
पहिल्या टप्प्यात पंचगंगा नदीचे पाणी राधानगरी धरणातून दुधगंगेत नेण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी बोगदा खोदाईसह १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी बॅरेजेस उभारले जातील. मात्र, पुराचे ६५ अब्ज घनफूट पाणी बोगद्याद्वारे भीमेत आणण्याचा दुसरा प्रस्ताव खर्चिक आहे. त्यासाठी केंद्र सरकार, जागतिक बँक, नाबार्ड, आशियाई विकास बॅंकेकडून निधी मिळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्याचे सर्वेक्षण अद्यापही सुरु आहे, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, जलसंपदा विभागाची महामंडळाने पूर्णतः स्वायत्त आहेत. महामंडळाच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. मत्यपालन, पर्यटन अशा विविध गोष्टीतून उत्पन्न वाढविण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे पगार करण्याच्या दृष्टीने उत्पन्न वाढविण्याच्या सूचना महामंडळाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.