पुणे: राज्यात कीटकजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्यात यंदा हिवतापाचे सर्वाधिक तीन हजार ५५२ रुग्ण गडचिरोलीत सापडले आहेत. मुंबईत हिवतापाचे दोन हजार ८५३ रुग्ण आणि डेंग्यूचे एक हजार ५५१ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात औषधफवारणी सुरू केली असून, गडचिरोलीतील हिवतापग्रस्त भागात मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात हिवताप आणि डेंग्यूचा उद्रेक गडचिरोली आणि मुंबईत झाला आहे. त्याखालोखाल ठाणे महापालिकेच्या हद्दीत हिवतापाचे २०४ आणि डेंग्यूचे ७४ रुग्ण आढळले आहेत. गोंदिया जिल्ह्यात हिवतापाचे १२६ आणि डेंग्यूचे ५३, चंद्रपूरमध्ये हिवतापाचे ११८ आणि डेंग्यूचे १५ रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात हिवतापाचे ३ आणि डेंग्यूचे ५७ रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका हद्दीत हिवतापाचा एकही रुग्ण आढळला नसून, डेंग्यूचे ३९ रुग्ण सापडले आहेत.

आणखी वाचा-अखेर पिंपरी महापालिकेतील नोकरभरतीचा निकाल जाहीर

राज्यातील कीटकजन्य आजारांचे प्रमाण जुलै महिन्यापासून वाढू लागले आहे. यामुळे हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात आशा स्वयंसेविकांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. दुर्गम भागात हिवतापाच्या तत्काळ निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक किटचा पुरवठा करण्यात आला आहे. डेंग्यू रुग्णांचे नमुने विषाणू परीक्षणासाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात येत आहेत. राज्यात १८ जिल्ह्यांत हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

आणखी वाचा-महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड; मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

राज्यात नागरी हिवताप योजनेत समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, अकोला, पुणे आणि मुंबई या १५ शहरांत उपाययोजना केल्या जात आहेत. या शहरांमध्ये डासोत्पत्ती ठिकाणी औषधाची फवारणी केली जात आहेत. -प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य सेवा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaria dengue infection in the state most patients in gadchiroli and mumbai pune print news stj 05 mrj