पुणे : समृद्धी महामार्गावरील सातत्याने अपघाताच्या पार्श्वभूमीवर ‘मर्सिडीज बेंझ’ कंपनीने हा रस्ता अपघातमुक्त करण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे. मर्सिडीज कंपनीकडून या मार्गावर अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीने वैद्यकीय प्रथमोपचार मिळावेत म्हणून ‘ट्राॅमा सेंटर’ची साखळी उभारण्यास सुरुवात केली आहे.

या उपक्रमाबद्दल आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी चाकण येथील ‘मर्सिडीज बेंझ’ कंपनीला भेट दिली. या वेळी कंपनीच्या शिष्टमंडळाने उपक्रमाबाबत माहिती दिली.

समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात, जीवितहानी यामुळे प्रवाशांच्या मनात या मार्गावरून प्रवास करण्यास भीती निर्माण झाली आहे. हे अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने हा रस्ता पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदतीसाठी महामार्गालगत दूरपर्यंत प्रथमोपचार केंद्र नाही. त्यामुळे अपघातग्रस्त ठिकाणांची तपासणी करण्यात येणार असून, त्या ठिकाणी उपाययोजना आणि ठरावीक अंतरावर ट्राॅमा सेंटरची साखळी निर्माण करण्यात येणार आहे.

या महामार्गावर कंपनीकडून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत असून, अपघातप्रवण क्षेत्र, अपघातग्रस्त ठिकाणी दिशादर्शक फलक, अपघात टाळण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. मर्सिडीज कंपनीने राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये मोलाची कामगिरी बजावली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

या संस्थेचाही अभ्यास

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तीन महिने संशोधन केले. या संशोधन अभ्यासात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले असून आता मर्सिडीज बेंझ कंपनीने महामार्गावर तपासणी करून सातत्याने अपघात होणाऱ्या ठिकाणांवर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी म्हणून ट्रॅामा सेंटरची साखळी उभारण्यात येत आहे.