लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: जगभरात युद्धप्रकारामध्ये बदल होत आहेत. पारंपरिक युद्धप्रकाराबरोबर नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पृष्ठभाग आणि हवाई युद्धाबरोबर सायबर आणि अवकाश क्षेत्रात आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत संपर्करहित (कॉन्टॅक्टलेस) आणि अगतिज (नॉन कायनेटिक) काम करणाऱ्या पद्धतींचा विकास करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्यक्त केले.

‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’च्या (डाएट) पदवीप्रदान कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख समीर कामत आणि संस्थेचे कुलगुरू सी. पी. रामनारायण या वेळी उपस्थित होते. विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २७२ विद्यार्थ्यांना राजनाथ सिंह यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

हेही वाचा… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट

राजनाथ सिंह म्हणाले, संशोधनाला पंख देण्याच्या उद्देशातून या संस्थेची स्थापना झाली आहे. त्यामुळे संशोधन आणि विकास यावरच प्राधान्याने भर राहिला आहे. संरक्षण क्षेत्राबरोबरच नागर समाजाला उपयुक्त ठरेल असे नाविन्यपूर्ण संशोधन करायला हवे. गुगल मॅपवरून प्रत्येकाला रस्ता दाखविणारी जीपीएस प्रणाली आणि प्लास्टिक सर्जरी ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत.

हेही वाचा… १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरू आहे. संरक्षण उत्पादनांची आयात करण्यापेक्षा भविष्यात निर्यातदार होण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातून अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. नावीन्यपूर्ण संशोधनातून प्रगती करून देशाची सुरक्षा व्यवस्थेला मजबूत करण्यामध्ये संस्था योगदान देईल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister of defence rajnath singh was talking about the new challenges in pune print news vvk 10 dvr